Pawana Dam Water Storage Pudhari
पिंपरी चिंचवड

Pawana Dam Water Storage: पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ 23 टक्के जलसाठा शिल्लक

पाऊस लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाईचा फटका बसू शकतो.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा मावळातील पवना धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. प्रचंड उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवण होत आहे. परिणामी, धरणाचे पात्र पाण्याविना उघडे पडले आहे. त्यामुळे धरणातील उंचवठे, दगड, माती व गाळ दृष्टीस पडत आहे. पाऊस लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाईचा फटका बसू शकतो.

पिंपरी-चिंचवड शहरासह नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच, एमआयडीसीला वर्षभर पवना धरणातून पाणी दिले जाते. महापालिका पवना धरणातून सोडलेले पाणी पवना नदीवरील रावेत येथील बंधार येथून अशुद्ध जलउपसा केंद्रात उचलले जाते.

दररोत 550 एमएलडी अशुद्ध पाणी उपसा करून ते प्राधिकरण, निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. तेथे शुद्धीकरण प्रक्रिया करून संपूर्ण शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाते. तसेच, आंद्रा पाणी योजनेतून निघोजे बंधारा येथून दररोज 90 एमएलडी पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवले जाते. तेथे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी त्या परिसराला पुरवले जाते.

धरणाचे पात्र पडले कोरडे

प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. धरणात गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ 23 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणाचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडले आहे.

तेथून शेतकरी गाळ काढून नेत आहेत. धरणातील पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, पावसाळा लांबणीवर पडल्यास पिंपरी-चिंचवड शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

आंद्रा, भामा आसखेड, मुळशी धरणसाठ्यातील साठा झाला कमी

मावळ तालुक्यातील आंद्रा धरणात सध्या 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आंद्रा पाणी योजनेतून महापलिकेकडून निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून दररोज 90 एमएलडी पाणी उचलले जाते.

चिखली केंद्रात ते पाणी शुद्ध करून परिसराला दिले जाते. भामा आसखेड धरणात 31 टक्के पाणीसाठा पातळी आहे. भामा आसखेड पाणी योजना प्रकल्प अर्धवट असल्याने पिंपरी-चिंचवड शहराला अद्याप अतिरिक्त 167 एमएलडी पाणी उपलब्ध झालेले नाही. शहराजवळच्या मुळशी धरणात 19 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या धरणाचे पाणी मुळा नदीस सोडले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT