पिंपरी: पौड येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण मुळशी तालुक्यातील खटले या न्यायालयात वर्ग करण्यात आले आहेत. शहरातील हिंजवडी आणि वाकड पसिरातील खटलेही या न्यायालयात चालणार आहेत. यापूर्वी हिंजवडीचा अर्धा भाग शिवाजीनगर कोर्टात, तर वाकडचा अर्धा भाग पिंपरी कोर्टात चालविला जात होता. मात्र, पौड येथील न्यायालयामुळे आता संपूर्ण वाकड आणि हिंजवडी भागातील खटले पौड येथे चालविले जात आहेत. त्यामुळे येथील नागरिक आणि पक्षकारांना पिंपरी ऐवजी पौड येथे हेलपाटा मारावा लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांची अडचण वाढली
हिंजवडी व वाकड परिसर हा आयटी पार्क, निवासी संकुले आणि व्यापारी केंद्रांमुळे अतिशय वेगाने विकसित झाला आहे. हजारो कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. मात्र, या भागातील नागरिकांना आता पौड रोड न्यायालयापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. वाहतूककोंडी, सार्वजनिक वाहतूक कमी आणि प्रवासाचा जास्त वेळ यामुळे दिवसभराचा वेळ खर्ची पडतो. अनेक पक्षकारांना कामाच्या वेळात कोर्टात उपस्थित राहणे कठीण जाते.
वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचीही अडचण
फक्त नागरिकच नव्हे, तर वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वकील पिंपरी न्यायालयात कार्यरत आहेत. आता त्यांना पौंड येथे रोज ये-जा करावी लागत असल्याने वेळ आणि प्रवास खर्च वाढला आहे.
स्थानीय लोकप्रतिनिधींकडे मागणी
हिंजवडी-वाकड परिसराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे, किमान अंतर ठेवून न्यायालयीन सोयी पिंपरी किंवा हिंजवडी परिसरात उपलब्ध कराव्यात, पौंडरोड न्यायालय स्थापनेमुळे ग््राामीण भागातील सोयी वाढल्या असल्या तरी हिंजवडी-वाकडसारख्या शहरी भागातील लोकांसाठी ही रचना त्रासदायक ठरत आहे. न्यायालयीन सोयी जवळच्या भागात मिळाव्यात, ही नागरिकांची मागणी अधिकाधिक जोर धरत आहे.
पिंपरी न्यायालयाजवळ असूनही पौडपर्यंत प्रवास
पिंपरी न्यायालय हे हिंजवडी व वाकडपासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक वर्षे वाकड येथील भागातील खटले पिंपरी न्यायालयात चालत होते. परंतु, पौड येथे नवीन न्यायालय स्थापन झाल्यानंतर हे खटले तेथे हलविण्यात आले. पिंपरी न्यायालय जवळ असूनही आता त्यांना लांबच्या पौंडरोडपर्यंत जावे लागते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिवसभर काम करणारे कर्मचारी यांना न्यायालयात उपस्थित राहणे अधिकच कठीण झाले आहे.
वाकड-हिंजवडी भाग आयटी परिसर आहे. कामाच्या व्यापामुळे येथील नागरिकांना वेळात वेळ काढून पौंड गाठावे लागते. बऱ्याचदा यामुळे रजा घ्याव्या लागत आहेत. परिणामी मानसिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.ॲड. प्रमिला गाडे, माजी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन
पूर्वी वाकड येथील खटले पिंपरी न्यायालयात सुरू होते. त्या वेळी आम्हाला कोर्टात ये-जा करणे सोपे होते. आता त्याच कामासाठी अधिकचा वेळ, पैसा खर्च करावा लागत आहे.सुलोचना काळे, कर्मचारी