पिंपरी चिंचवड

Jijamata hospital Pimpri issues: जिजामाता रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची कमतरता

सोनोग्राफीची अद्यावत मशीन नाही, लिफ्ट नादुरुस्त

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात दररोज 500 ते 600 बाह्यरुग्ण उपचारासाठी येत असतात; पण येथे विविध वैद्यकीय सुविधांची कमतरता पाहण्यास मिळत आहे. वारंवार लिफ्ट बंद पडणे, बसण्यासाठी अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरवस्था यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.

जिजामाता रुग्णालयात 130 बेडची व्यवस्था आहे. याठिकाणी 400 कर्मचारी, 45 डॉक्टर्स आणि 96 परिचारिका आहेत. याठिकाणी जनरल, मेडिसिन आणि प्रसूतीकक्ष, बालरोग विभाग, 8 नवजात शिशु अतिदक्षता विभाग, डायलिसीस व अतिदक्षता विभाग 10 बेड, लसीकरण आदी सुविधा आहेत.

बसण्यासाठी अपुरी व्यवस्था

रुग्णालयात बसण्यासाठी अपुरी व्यवस्था आहे. एकाच मजल्यावर सर्व ओपीडी असल्यामुळे रुग्णांच्या रांगा असतात. केस पेपर काढण्यासाठी मोठी रांग होती. तसेच, औषधे घेण्यासाठीही गर्दी दिसून येते. पिंपरी, काळेवाडी, जुन्नर, खेड, मावळ याठिकाणातील रुग्ण तपासणीस येत असतात. रुग्णालयाच्या ओपडीची जागा देखील अपुरी आहे. येथे बसण्यासाठी पुरेशी जात नसल्याने गर्दीच्या वेळी रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल होतात.

डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा अभाव

रुग्णालयात न्यूरोलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट नाहीत. पूर्ण वेळ कार्डियालॉजिस्ट नाहीत. फक्त एका तासासाठी येतात. त्यात जेवढे रुग्ण होतील तेवढ्यांची तपासणी केली जाते.

सोनोग्राफीसाठी जुने मशीन

नवीन रुग्णालय सुरू होऊन 5 ते 6 वर्षे होत आले तरी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी जुनेच मशीन आहे. दिवसाला याठिकाणी 25 ते 30 सोनोग्राफी करण्यात येतात. गरोदर महिलांना ॲनामली स्कॅन करण्याची गरज भासते ती सुविधा रुग्णायात नाही. त्यासाठी वायसीएम किंवा थेरगाव रुग्णालयात जावे लागते.

काही स्वच्छतागृह बंद

रुग्णालयातील काही स्वच्छता गृहे बंद आहेत. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या महिला, पुरूष यांची गैरसोय होते. बाह्यरुग्ण विभागात तपासणी व उपचारासाठी आलेल्या महिलांना प्रसूती कक्षातील स्वच्छतागृहात जावे लागते. तर, सुरू असलेल्या स्वच्छतागृहामध्ये वॉश बेसीन तुंबलेली आहेत.

लिफ्ट सतत नादुरुस्त

रुग्णालयातील लिफ्ट सतत नादुरुस्त असतात. एक लिफ्ट डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठी तर, दुसरी रुग्णांच्या नोवाईकांसाठी आहे. अशावेळी एकाच लिफ्टवर भर येतो. तातडीच्यावेळी एखाद्या गंभीर रुग्णाला नेण्याची वेळ आली तर धावपळ होते. आयसीयसारख्या ठिकाणी असलेली लिफ्टदेखील बंद असलेली दिसून आली आहे. तसेच, लिफ्टमध्ये लिफ्टमनदेखील नसतो.

रुग्णालयात न्युरोलॉजिस्ट नाहीत. कार्डियालॉजिस्ट एका तासासाठी येतात. येथे अपडेट सोनोग्राफी मशीन नाही. ॲनामली स्कॅन होत नाही.
- डॉ. नासीर अल्वी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालय
रुग्णालयातील लिफ्ट वारंवार बंद पडते. एकच लिफ्ट सुुरू असल्याने तातडीच्या वेळी फक्त रुग्ण आणि कर्मचारी यांनाच सुरू असलेल्या लिफ्टने जाण्यास प्राधान्य असते. आम्हाला लिफ्ट येईपर्यंत थांबावे लागते. तसेच, बसण्यासाठी जागा अपुरी असल्याने ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांची गैरसोय होते.
- अभिजित देडे, नागरिक
ओपीडीच्या ठिकाणचे स्वच्छतागृह नादुरुस्त असल्याने त्याला कुलूप असते. तपासणीसाठी वेळ लागला तर गरजेच्या वेळी प्रसूतीगृहातील स्वच्छतागृहात जावे लागते.
- सविता भिंगारदिवे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT