देहूगाव : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील झेंडेमळा-देहूरोड पट्ट्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या रस्त्याशी संबंधित जबाबदारी झटकली असून, याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले आहे. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, महापालिका आणि सार्वजनिक बविभागाच्या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिक आणि वारकरी मात्र त्रस्त झाले आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही दखल नाही
चिंचोली येथील ग्रामस्थांनी पालखी मार्गाची दुर्दशा, संरक्षक पट्ट्यांचा अभाव तसेच चिंचोलीतील पालखी विसाव्यातील गैरसोयीबाबत तहसीलदार (गृह शाखा) व विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार कार्यालयाने 8 ऑगस्ट 2025 तर सार्वजनिक बांधकाम विभागाने 4 एप्रिल 2025 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेला रस्ता दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 116 मधील किमी 3/00 ते 5/800 (झेंडेमळा ते देहू महाद्वार कमान) या महत्त्वपूर्ण पालखी मार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र देण्याचाही प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने या संपूर्ण मुद्द्यावर 24 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालयाला पत्र पाठविले होते. यामध्ये हा रस्ता 6 जून 2019 रोजी महापालिका सभेच्या ठरावानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे याची जबाबदारी महापालिकेची नसल्याचे सांगितले होते. सभा ठराव क्रमांक 407 (दि. 6 जून 2025) नुसार हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगत चिंचोली हे गाव देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीत असल्याने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट पत्र पाठवून महापालिकेने सांगितले होते.
देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हे तिन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे पालखी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. रस्त्यावर हजारो खड्डे, प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या रांगा यामुळे वारकऱ्यांचे हाल होत आहेत. वारकरी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या हितासाठी हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील झेंडेमळा-देहूरोड पट्ट्याची झालेली दुरवस्था.