मिलिंद कांबळे
पिंपरी : पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराचे हवामान अधिक सुखद असल्याने शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. टोलेजंग गृहप्रकल्प उभारणीची संख्या मोठी आहे. असे असले तरी, शहरात पर्यावरणपूरक इमारतीचे (ग्रीन बिल्डिंग) प्रमाणपत्र घेण्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. पर्यायाने पर्यावरण संवर्धनात बांधकाम व्यावसायिक उत्सूक नसून, महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अधिकचा मिळतो ‘एफएसआय’
ग्रीन बिल्डिंगसाठी वेगळा प्रस्ताव द्यावा लागतो. केंद्र शासनाची मान्यता असलेल्या इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी), ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट अॅसेसमेंट (ग्रीहा), ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बीईई स्टार), एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (ईसीबीसी), एक्सलन्स इन डिजाईन फॉर ग्रेटर एफिशिअन्सी (ईडीजीई) या संस्थांकडून संबंधित इमारत बांधकामांच्या सर्व तपासण्या करून घ्यावा लागतात. त्यानंतर त्या प्रकल्पास देशपातळीवरील ग्रीन बिल्डिंगचे ग्रीन प्रमाणपत्र (हरित प्रमाणपत्र) दिले जाते. आंतरराष्ट्रीय ग्रीन बिल्डिंगच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देणार्या युएसए, यूके, कतार, सिंगापूर येथे संस्था आहेत. ते प्रमाणपत्र प्लॅटिनम, गोल्ड, स्टार अशा स्वरूपात असते. त्या प्रमाणपत्रानंतर बांधकाम परवानगी विभागाकडे त्या प्रकल्पाची ग्रीन बिल्डिंग म्हणून नोंद होते. संबंधित प्रकल्पास अधिकचा एफएसआय दिला जातो. प्रकल्पांतील सदनिकांधारकांना मालमत्ताकरात सवलत मिळते. तसेच, इतर सवलती मिळतात.
असे असले तरी, शहरात ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शहरातील केवळ 7 गृहप्रकल्पांनी ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र घेतले आहे. शहरातील बांधकामांची संख्या लक्षात घेता, हे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रस्ताव देऊनही ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकांस महापालिकेकडून अडीचपट दंड केला जातो, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
ग्रीन बिल्डिंगचे फायदे
ग्रीन बिल्डिंगमुळे पाणी, ऊर्जा, तसेच, अन्य संसाधनांची बचत होते. नैसर्गिक सूर्यप्रकाश तसेच, हवा खेळती राहील अशी रचना केल्याने विजेचा वापर कमी होतो. ऊर्जा बचत करणार्या एलईडी दिव्यांचा वापर केला जातो. स्टार रेटिंग असलेल्या एअर कंडिशनिंग वापरले जातात. बांधकाम करताना स्थानिक पातळीवर साहित्याचा वापर तसेच, रिसायकल्ड वस्तूंचा वापर केलेले साहित्य वापरले जाते. इमारतींमध्ये पाणी वाचविणे, त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी जलव्यवस्थापन असते. त्यामुळे पाण्याचा कमी वापर होऊन पाणी बचत होते. पावसाच्या पाण्याचा वापर केला जातो. इमारतीमध्ये कचरा कमी निर्माण केला जातो किंवा तेथेच जिरवला जातो. इमारतींच्या आवारात झाडे व हिरवळ असते. पर्यावरण संवर्धन करून जैवविविधतेचे रक्षण केले जाते. ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र असलेल्या इमारतींना महापालिकेच्या विविध सवलती मिळतात. बांधकाम परवानगी विभागाकडून 3, 5 आणि 7 टक्के एफएसआय दिला जातो. त्यामुळे अधिकचे बांधकाम करता येते. तसेच, करसंकलन विभागाकडून मालमत्ताकरात सवलत दिली जाते.
वर्ल्ड ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या व्याख्येनुसार पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणार्या इमारतींना ग्रीन बिल्डिंगचा दर्जा मिळतो. अशा इमारतींची रचना करतानाच अनेक पर्यावरणपूरक बाबींचा विचार केलेला असतो. बांधकामांसाठी पर्यावरणपूरक घटकांचा आणि पद्धतींचा अवलंब केला जातो. देशात पर्यावरणपूरक इमारतींना इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी)कडून ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र दिले जाते.