

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चिखली, कुदळवाडीत मोठी धडक कारवाई करत अनधिकृत भंगार गोदामे, लघुउद्योग व विविध आस्थापना भुईसपाट करण्यात आले. त्या वेळी प्रार्थनास्थळांना कारवाईतून वगळण्यात आले होते; मात्र आता पालिकेकडून अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. त्यानुसार, 31 प्रार्थनास्थळांना नोटीस बजावण्यात आली असून, बांधकाम काढून घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेने या भागात कारवाई करून सुमारे सात हजार व्यावसायिक आस्थापनांवर हातोडा मारला. कारवाईनंतर लघुउद्योजकांना आर्थिक संकटात आणल्याचा आरोप महापालिका प्रशासनावर झाला होता. त्या वेळी कारवाईपासून प्रार्थनास्थळे, शाळा, दवाखाने, बँका, एटीएम, पेट्रोल पंप आणि निवासी घरे वगळण्यात आली होती. मात्र, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार अनधिकृत प्रार्थनास्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
चिखली, कुदळवाडीतील एकूण 31 प्रार्थनास्थळांना बांधकाम परवानगी विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या सहीने गुरुवार (दि.24) पासून नोटिसा बजाविल्या आहेत.
प्रार्थनास्थळाच्या दरवाज्यावर त्या नोटिसा चिकटविण्यात आल्या आहेत. त्यांना पंधरा दिवसांची मुदत देत प्रार्थनास्थळाचे बांधकाम काढून घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानंतर पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई करीत ती प्रार्थनास्थळे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. करीत असल्याचे चित्र आहे.
अनधिकृत प्रार्थनास्थळांना महापालिकेने गुरुवारी (दि.24) अचानक नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा मिळताच पिंपरी येथील महापालिका भवनाच्या प्रवेशव्दारासमोर शुक्रवारी (दि.25) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या (आठवले गट) वाहतूक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासन व आयुक्त चुकीच्या पध्दतीने कारवाई करीत आहेत. जाणीवपूर्वक लक्ष्य करून शहराची जातीय सलोखा व शांतता बिघडविण्यासाठी कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.