गणेश मंडळांना ऑनलाईन परवाना File Photo
पिंपरी चिंचवड

Ganesh Mandal Permit: गणेश मंडळांना ऑनलाईन परवाना

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका व पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ, हाऊसिंग सोसायटींना गणेशोत्सवासाठी दिल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणार आहेत.

शहरातील तसेच, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. मंडळ व हाऊसिंग सोसायट्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. (Latest Pimpri News)

मंडळातील सभासदाने स्वतःचे खाते महापालिकेच्या संकेतस्थळावर www. pcmcindia.gov.in उपलब्ध असलेल्या गणेश उत्सव मंडप परवानगी 2025 या लिंकवर तयार करणे करणे आवश्यक आहे. खाते तयार करताना मोबाईल ओटीपीद्वारे खात्यावरील मोबाईल क्रमाकांची नोंद घेतली जाईल.

मंडळ हे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील आहे अथवा नाही हे नोंदवणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या त्या प्रकारचे आवश्यक कागदपत्रे यांची मागणी संगणक प्रणालीमार्फत केली जाऊ शकते. महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत नोंदणी केली जाणार आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य विभाग सर्वप्रथम ना हरकत दाखला देईल. त्यानंतरच संगणक प्रणाली अंतिम दाखला मंडळांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे.

महापालिकेकडून ना हरकत दाखला मिळाल्यानंतरच पोलिस आयुक्त कार्यालयाची प्रक्रिया सुरू होणार आहे, ज्या अर्जाना महापालिका अंतिम ना हरकत दाखला देते तीच प्रकरणे ही पोलिसांकडे संगण संगणक प्रणालीद्वारे फॉरवर्ड केली जाणार आहेत. महापालिकेच्या ना हरकत दाखल्यानंतर पोलिसांकडून संबंधित अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्या त्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वाहतूक विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या ना हरकत दाखल्यानंतर पोलिस कार्यालयाकडील अंतिम परवानगी मंडळास उपलब्ध होईल.

अर्ज करताना मंडळाने अध्यक्ष, अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे छायाचित्र, मोबाईल क्रमांक तसेच, देखाव्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध सुविधांची माहिती संगणक प्रणालीमध्ये पुरविणे आवश्यक आहे.

गणेश स्थापना व गणेश विसर्जन मिरवणूक यांच्या मार्गाची नोंद करणे. त्यामध्ये वापरली जाणार्‍या वाहनांची संख्या, देखावा, विद्युत रोषणाई इत्यादींची माहिती देखील नोंदविणे क्रमप्राप्त आहे. महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागामार्फत देण्यात येणारी ही सुविधा सर्व सार्वजनिक गणेश मंडळास विनाशुल्क पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

महापालिका हद्दीबाहेरील मंडळांना मिळणार परवाना

महापालिका क्षेत्राबाहेरील गणेश मंडळांना अर्ज करताना प्रथमतः तेथील नगर परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्याकडील ना हरकत दाखला मिळवणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील मंडळांना परवाना दिला जाणार आहे. देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, शिरगाव, परंदवाडी, तळेगाव आदी पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत येणारा परिसर व त्या परिसरातील मंडळ या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

मूर्ती विक्रेत्यांची नोंदणी आवश्यक

गणेशमूर्ती विक्रेत्यांना महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातून ना हरकत दाखला दिला जातो. विक्रेते शहरातील विविध भागांतील खासगी तसेच, सार्वजनिक जागेत स्टॉल उभारतात. आवश्यक कागदपत्रे व ना हरकत दाखल्याचे शुल्क हे अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. ही नोंदणी सर्व विक्रेत्यांना आवश्यक आहे, असे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT