Online Gaming Addiction in India
तुषार झरेकर
पिंपरी चिंचवड : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनात ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर बरीच चर्चा रंगलीये. पण यातील ऑनलाईन रमी गेमचं व्यसन आणि त्या व्यसनापायी असंख्य तरुण कर्जबाजारी झाल्याचं समोर आलंय. यात कित्येकांनी तर आपली शेतजमीन गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधववर तर 80 लाखांचं कर्ज झालंय. रमीच्या नादात अवघ्या 26व्या वर्षीचं त्याचं आयुष्य उध्वस्त झालं. पिंपरी चिंचवडमध्ये रिअल इस्टेटच्या व्यवसायातून उभे केलेले 23 लाख, मित्रमंडळीकडून घेतलेलं 20 लाखांचं कर्ज, करमाळा येथील दीड एकर शेती आणि स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेऊन 20 लाखांचं कर्ज उचललं. रमीच्या आहारी गेलेल्या जयच्या डोक्यावर जवळपास 80 लाखांचं कर्ज झालं.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ पाहून जय चांगलाच संतापलाय. मंत्र्याचा व्हिडीओ पाहून कोणीही चुकीची प्रेरणा घेऊ नका, झालं तेवढं नुकसान पुरे, आता आहे तिथं थांबा, असं आवाहन जयने केलंय.
जय ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात कसा ओढला गेला?
करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावाचे माझे दोन मित्र आहेत. ते दोघं निगडीत राहतात. त्यांच्या माध्यमातून मला एक लिंक आली. मी त्या लिंकवरून गेम डाऊनलोड केला आणि रमी खेळू लागलो. सुरूवात ५ हजारापासून झाली. मी पाच हजार टाकले आणि मला 50,000 हजार रुपये मिळाले. मग माझ्या अपेक्षा वाढत गेल्या आणि ऑनलाइन रमीवर पैसे उडवू लागलो, असे जयने ‘पुढारी न्यूज’ला सांगितले.
गेमिंगसाठी पैसे कुठून आले?
माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. माझा व्यवसाय आहे, माझे जे ओळखीचे होते त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. याच मित्रांकडून मी पैसे उधार घेतले. माझ्याकडची कार मी करमाळ्याच्या सावकाराकडे गहाण ठेवली. त्यांनी सात टक्के व्याजाने पैसे दिले होते. गेमपायी मी अक्षरश: कर्जबाजारी झालो, असं जय सांगतो.
घाबरू नका, बाहेर पडा
ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरलो हे सांगताना लोकांना भीती, लाज वाटते. मी तसा नाही. उलट मला खंत वाटते की मी यात अडकलो. मी माझा अनुभव सांगितल्याने चार लोक ऑनलाइन गेमिंगपासून लांब जाणार असेल तर कधीही चांगलंच, असंही जयला वाटते.
चुका होतात, त्यातून सावरा
चूक होणं वाईट नाही. पण त्यामधून सावरणं, बाहेर पडा. ऑनलाइन गेमिंगऐवजी चांगला व्यवसाय निवडा, चार चांगले मित्र जोडा, त्यांच्याशी चर्चा करून दुष्टचक्रातून बाहेर पडा, असं आवाहन तो करतो. ऑनलाइन गेमिंगमध्ये ओढणारे माझे मित्रच आहेत, यातून काढणारेही मित्रच आहे. माझ्या कुटुंबाला याचा नाहक त्रास झाला. आता माझ्यावर कर्ज असले तरी मी त्यामधून बाहेर पडीन, असा विश्वास तो व्यक्त करतो.
गेम नव्हे हा जुगारच
ऑनलाइन रमीसारखे हे गेम नसून जुगारच आहे. हे तुमच्या उत्पन्नाचा स्रोत होवू शकत नाही. यातून बाहेर पडणे हाच एकमेव मार्ग आहे, असं कळकळीचे आवाहन त्याने केले.