सोमाटणे: अहिरवडे फाटा ते मुंढावरे दरम्यानच्या जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तांत्रीक विभागकडून महामार्गाची तात्काळ तपासणी करुन अपघाताच्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे पत्र कामशेत पोलिसांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) पाठविले आहे.
वाहनांचे नुकसान
सद्यास्थितील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना हायवे रोडवरील वाहतुकीमुळे जीवितास धोका निर्माण झाला असून, अपघातात वाहनाचेदेखील नुकसान होत आहे. जुन्या महामार्गावर लोणावळा, खंडाळा, पवनानगर, लोहगड, तुंगी आदी किल्ले आणि इतर लोकप्रिय पर्यटन ठिकाणी जाण्याकरीता पर्यटक, तसेच एकवीरा देवी मंदिर, देहू, आळंदी या धार्मिक ठिकाणी जाण्याकरिता भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात.
तळेगाव, चाकण एम.आय.डी.सीकडे जाणार्या मालवाहतूक वाहनांना हा महामार्ग मुंबई येथे जाण्यास सोईस्कर आहे. त्यामुळे येथे रहदारी जास्त असल्यामुळे अपघातामध्ये वाढ झाली असल्याचे म्हटले आहे.
स्ट्रीट लाईटची मागणी
खामशेत ते संदीप हॉटेल दरम्यान रात्रीच्यावेळी बंद पडलेल्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट परिसरात रोडच्या मध्यभागी स्ट्रीट लाईट लावाव्यात, खामशेत घाट परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत, खामशेत घाट ते कामशेत उड्डाणपुल दरम्यान तसेच रोडचे आजूबाजूच्या गावाकडे जाणारे रोड, झेब्रा क्रॉसिंग ठिकाणी रिफ्लेक्टर, सूचना, वेग मर्यादा फलक, लावावेत, खामशेत घाटामध्ये, तसेच पाथरगाव येथील तीव्र उताराच्या ठिकाणी वाहनाच्या गतीवर नियंत्रण राहणे आवश्यक आहे.
त्या करिता घाट, तीव्र उतराच्या ठिकाणी ऑनलाईन चलन नोंदणी करिता कॅमेरे बसवावेत, तीव्र आणि अपघाती वळणाच्या ठिकाणी किमान 6 फूट उंचीचे रोलींग बॅरीगेट लावावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.