पिंपरी: प्रेमसंबंध प्रकरणातून मुलीकडील नातेवाईकांनी तरुणाला चर्चा करण्यासाठी बोलावून बेल्टने व दोरीच्या सहाय्याने खून केला. 22 जुलै रोजी रात्री पिंपळे गुरव येथील देवकर पार्क परिसरात घटना घडली. याप्रकरणी आता नऊ जणांना अटक केली आहे.
रामेश्वर घेंगट (26) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत विनोद खोकर, करण विनोद खोकर (दोघे रा. कोंढवा, पुणे), सुरेंद्र हरी सारसर, प्रशांत हरी सारसर, सागर हरी सारसर व अन्य महिला आरोपी (सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी), अक्षय राजेश सारसर (रा. सोमवार पेठ, पुणे), युवराज सोळंकी, नवीन दशरथ पिवाल (रा. देवकर पार्क, पिंपळे गुरव), विनोद पापाजी सोळंकी (रा. लोहगाव, पुणे) यांच्यासह एकूण 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
यापैकी नवीन पिवाल आणि विरोद सोळंकी वगळता इतर सर्वांना अटक केली आहे. रवि किसन घेंगट (45, रा. शुरवीर चौक, ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा रामेश्वर घेंगट याचे एका मुलीशी प्रेमसंंबंध होते. त्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी फिर्यादीस चर्चेसाठी देवकर पार्क, पिंपळे गुरव येथे बोलावले; मात्र, त्या वेळी रामेश्वरला घरात कोंडून ठेवले.
त्याचा मोबाईल काढून घेत लाथा-बुक्क्या, बेल्ट व रस्सीच्या साहाय्याने गंभीर मारहाण केली; तसेच त्याचा गळा आवळला त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला उपचारासाठी नेले. मात्र, उपचारादरम्यान रामेश्वरचा मृत्यू झाला. सांगवीचे पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर तपास करीत आहेत.