निगडी-रावेत-चाकण मेट्रो मार्गाबाबत लोकप्रतिधींकडून सूचना; महामेट्रोकडून प्रकल्पाचे सादरीकरण Pudhari
पिंपरी चिंचवड

MahaMetro: निगडी-रावेत-चाकण मेट्रो मार्गाबाबत लोकप्रतिधींकडून सूचना; महामेट्रोकडून प्रकल्पाचे सादरीकरण

लोकप्रतिनिधींनी केलेल्या सुचनांनुसार डीपीआरमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, रावेत, पुनावळे, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा मार्गे चाकण या नव्या मार्गाचा डीपीआर पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (महामेट्रो) बनवून घेतला आहे.

त्या प्रकल्पासंदर्भात शहरातील लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांना महापालिका व मेट्रोच्या अधिकार्‍यांकडून माहिती देण्यात आली. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सुचनांनुसार डीपीआरमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.  (Latest Pimpri News)

महामेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयात सोमवारी (दि.1) बैठक झाली. बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, एनएचआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ, महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, माजी गटनेते राहुल कलाटे, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नव्या मार्गाच्या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करून तांत्रिक, आर्थिक व संबंधित बाबींची माहिती देण्यात आली. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या उपयुक्त सूचना व मते नोंदविण्यात आल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकल्प मार्गातील काही बदल सुचविले आहेत.

मेट्रो कोच तीनऐवजी सहा डब्यांची हवी

निगडी ते चाकण या नव्या मेट्रो मार्गावर तीन डब्यांची (कोच) मेट्रोऐवजी सहा डब्यांची मेट्रो धावणे आवश्यक आहे. तसा डीपीआरमध्ये बदल करावा. या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड व चाकण औद्योगिक क्षेत्र जोडले जाणार आहे. रोजगार वाढीसाठी मेट्रो आवश्यक आहे, असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

भोसरीत मेट्रो स्टेशन प्रस्तावित करा

निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापासून कॅनबे चौक ते चाकण असा मेट्रोच्या नव्या मेट्रो मार्ग असावा. निगडी, रावेत, पुनावळे, नाशिक फाटा ते चाकण या नव्या मार्गात भोसरी मेट्रो स्टेशन हवे. त्यादृष्टीने प्राधान्याने विचार करून डीपीआरमध्ये बदल करण्यात यावा, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

दोन्ही मेट्रोत हवा समन्वय

वाकड येथील भुजबळ चौक येथे महामेट्रो व पीएमआरडीए या दोन्ही मेट्रो मार्ग जोडले जाणार आहेत. पीएमआरडीएचा हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो मार्ग आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोयीस्कर असावी. मेट्रो स्टेशनच्या जवळपास पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, अश्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

गरज असल्यास भोसरी उड्डाणपूल पाडा

मेट्रोचा मार्ग नाशिक फाटाहून संत तुकारामनगरकडे न नेता थेट भोसरीकडे नेण्याचा विचार करावा. भोसरीतील सध्याचा उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्यावा. गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करावी.

त्याची तांत्रिक पडताळणी आठ दिवसांत करावी. या संदर्भात ‘पुढारी’ने ’‘नव्या मेट्रो मार्गातही भोसरीला डच्चू’ असे ठळक वृत्त रविवारी (दि.31) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवकांनी बैठकीत मुद्दे उपस्थित केले.

असा आहे मेट्रोचा मार्ग

निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्प चौक येथून हा नवा मार्ग सुरू होणार आहे. तेथून निगडीतील ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, रावेतमधील मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर असा मार्ग आहे. तेथून पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा येथे मेट्रो येणार आहे. तेथून संत तुकारामनगरकडे मेट्रो वळणार आहे. तेथून वल्लभनगर (वायसीएमजवळ), गवळीमाता चौक, भोसरी डिस्ट्रीक्ट सेंटर, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक अशी मेट्रो जाणार आहे. तेथून पुढे चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा मेट्रो मार्ग आहे.

लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामेट्रोमार्फत मेट्रो विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. बैठकीत शहरातील नवीन मेट्रो विस्तारीकरणाबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी हा प्रकल्प अहवाल शासनास पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

नव्या मेट्रो मार्गाबाबत

  • एकूण अंतर -40.926 किमी.

  • एकूण मेट्रो स्टेशन 31

  • पिंपरी-चिंचवडमधील स्टेशन 25

  • शहराबाहेरील स्टेशन- 6

  • एकूण खर्च- 10 हजार 383 कोटी 89 लाख रुपये

  • सन 2031 मध्ये अपेक्षित प्रवासी संख्या-3 लाख 38 हजार

  • काही मार्गावर बीआरटी व मेट्रोचे संयुक्त नियोजन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT