पिंपरी: निगडी प्राधिकरण परिसरात राबविण्यात येणारा हरित सेतू प्रकल्प हा शहराच्या नियोजनबद्ध व पर्यावरणपूरक विकासाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक, सुरक्षितता आणि सार्वजनिक सुविधा यामध्ये सकारात्मक बदल घडून येत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता निर्माण होत आहे. स्वतंत्र सायकल ट्रॅक व पदपथामुळे सायकलस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेला महत्त्व दिले गेले आहे.
पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन
हरीत सेतू प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित पदपथ, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र सायकल ट्रॅक तसेच, सार्वजनिक जागांचे सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे. यामुळे वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यायी, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यांची मांडणी अधिक शिस्तबद्ध झाली असून, पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढली आहे. नागरिकांना चालण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी व मोकळ्या जागांचा वापर करण्यासाठी सुस्थितीत सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
सद्यस्थितीत निगडी, प्राधिकरण परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित भागातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून हरीत सेतू प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत असून, परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. निगडी प्राधिकरण भाग अधिक स्वच्छ, सुरक्षित, शिस्तबद्ध व नागरिक केंद्रित बनवण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक आदर्श ठरत आहे, असे नागरिकांचे मत आहे.