पिंपरी : माजी महापौर राहुल जाधव यांनी जाधववाडी कुदळवाडी प्रभाग क्रमांक दोनचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या भाजपच्या पॅनलमध्ये माजी नगरसेविका सारिका नितीन बोऱ्हाडे, निखिल बोऱ्हाडे, नीलेश बोराटे, सोनल रवींद्र जांभुळकर या प्रमुख इच्छुकंचा समावेश आहे. माजी महापौरांच्या या पॅनलला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान आहे.
तर, भाजपाचे माजी नगरसेवक वसंत बोऱ्हाडे यांच्यानंतर माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपाली आल्हाट यांनीही हाती घड्याळ बांधले आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट या रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना प्रभागात पाहावयास मिळणार आहे. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, काँग्रेस, समाजवादी पार्टीचेही उमेदवार मैदानात आहेत.
धुळीचा त्रास, खराब रस्ते, अनधिकृत बांधकामे, जागा ताब्यात येत नसल्याने डीपी विकासाकडे दुर्लक्ष, अतिक्रमण, कमी दाबाने पाणीपुरवठा इत्यादी प्रमुख समस्या जाधववाडी, कुदळवाडी प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना जाणवत आहेत. अनधिकृत शेडविरोधात महापालिकेने धडक कारवाई मोहीम राबवून भुईसपाट केलेल्या कुदळवाडी परिसरात राडारोडा पडून असल्याने परिसर बकाल झाला आहे. अनेक शासकीय मोठे प्रकल्प या प्रभागात होत असल्याने निर्माण होणाऱ्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक रहदारीवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे जाळे नसलेल्या या प्रभागात धुळीचा आणखी त्रास वाढू शकेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भागात मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या निर्माण होत आहेत. लोकवस्ती वाढत आहे. रस्त्यांची कामे वेगात पूर्ण होत नसल्याने खडी, खड्डे आणि धुळीचा त्रास नागरिकांना होत आहे. हाऊसिंग सोसायट्यांची संख्या वाढत आहे. नामांकित शैक्षणिक तसेच, व्यावसायिक संकुल येथे आहेत. शासकीय मोठे प्रकल्प येथे निर्माण होत आहेत. मोकळ्या जागेत अनधिकृत पत्राशेडमुळे भंगार, लोखंड व फर्निचरची दुकाने वाढल्याने बकालपणा वाढला आहे.
जिल्हा सत्र न्यायालय, अभियांत्रिकी तंत्रज्ञान विद्यापीठ, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, महसूल विभागाचे सर्कल कार्यालय, उद्यान, विविध शासकीय कार्यालय उभारणी या प्रभागात करण्यात येत आहे. 140 फूट उंचीचे छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्मारकामुळे पर्यटनास चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र अपूर्ण अवस्थेच आहे. तळे उद्यान विकसित करण्यात आले आहे. महापालिकेच्या दोन शाळा इमारती बांधण्यात आल्या आहेत. पाण्याच्या तीन टाक्या, स्मशानभूमी, मोशी दशविधी घाट बांधला आहे. आपला दवाखाना, रामायण सभागृह, महिला व पुरुष व्यायामशाळा विकसित केली आहे.