ST Bus  Pudhari
पिंपरी चिंचवड

NCMC Smart Card: पिंपरीत एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीला प्रतिसाद

वल्लभनगर आगारात दररोज 120 ते 150 प्रवाशांची नोंदणी; एकाच काउंटरमुळे प्रतीक्षेत वाढ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) स्मार्ट कार्ड सेवा सुरू केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारात गेल्या काही दिवसांपासून या कार्डची नोंदणी प्रकिया सुरू आहे. दररोज 120 ते 150 प्रवासी नोंदणी करीत असल्यामुळे एसटीच्या सवलती मिळविणारे कार्ड काढण्यासाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद एसटी महामंडळास लाभत आहे.

एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांना सवलती हव्या असतील तर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे. त्यामुळे वल्लभनगर आगारात दररोज 120 ते 150 प्रवाशांची कार्डच्या नोंदणीसाठी गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

या नोंदणीसाठी ज्येष्ठांची आणि महिलांची गर्दी होताना दिसत आहे. सकाळपासून कार्ड नोंदणीसाठी रांगा लागत असून, आगारात केवळ एकच नोंदणी काउंटर उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, किमान आगारात नोंदणीसाठी अधिक कर्मचारी नेमावेत, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, या नोंदणीस पाच ते सहा मिनिटे लागतात.

ईबिक्स टेक्नोलॉजीस लिमिटेड (एनएसडीएल) पेमेंट्स बॅक यांच्या साहाय्याने ही सेवा राबविण्यात येत आहे. सर्व सवलतधारक तसेच विनासवलतधारक प्रवाशांना व्यक्तिगत कार्ड स्वरूपात वितरित केले जाणार आहे. या कार्डवर संबंधित व्यक्तीचे नाव, फोटो असणार आहे. हे कार्ड अहस्तांतरणीय असणार आहे.

नोंदणी 199 रुपयांत:

राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणीसाठी संबंधित व्यक्ती स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे. या वेळी आधार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक आहे. नोंदणीसाठी 199 रक्कम आकारली जात असून, पुढील एका महिन्यात संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर कार्ड मिळणार आहे. अशा माहिती प्रशासनाने दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी पाच रुपयांत अर्ज:

शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रकिया राबविण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पाससाठी अर्ज फक्त पाच रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अर्ज स्थानिक बसस्थानकांतून घेऊन, शाळेतील मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे. यामध्ये पालक व विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक अनिवार्य तसेच फोटो बंधनकारक आहे. आगारातील पास वितरण कक्षात मशिनद्रारे नोंदणी करून प्रवास अंतरानुसार पासची रक्कम, कार्डची फी आकारण्यात येते आणि पावती दिली जाते.

प्रवाशांना सवलतीच्या प्रवासासाठी कार्ड काढणे बंधनकारक आहे. तसेच कार्डमुळे सुट्या पैशांचा प्रश्न देखील मिटणार आहे. तसेच या स्मार्ट कार्डसाठी अंतिम मुदत जाहीर केलेली नाही.
पल्लवी पाटील, आगार व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT