पिंपरी: नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा उत्सव... याच आदिशक्तीचा जागर सोमवार (दि. 22) पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त घरोघरी घटस्थापनेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्योगनगरी परिसरातील देवींची मंदिरे रोषणाईने उजळून गेली असून, शहरभर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नवरात्रीनिमित्त मंदिरे सजली असून, विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांनी देखील दांडियाची जय्यत तयारी केली आहे. आजपासून शहरात दांडियाची धूम असणार आहे. रविवार (दि. 21) सुटीचा दिवस असल्याने घटपूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. (Latest Pimpari chinchwad News)
शहरातील आकुर्डी, निगडी, चिंचवड, खराळवाडी, फुगेवाडी, दापोडी, थेरगाव, पिंपळे गुरव, शाहूनगर व पिंपरीमधील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरांमध्ये फुलांची सजावट आणि विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिरांसमोर भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आकुर्डीतील श्री तुळजा भवानी मंदिरात श्रीसूक्तपठण, महाभोंडला तसेच दररोज आरती, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव येथील श्री मोहटादेवी मंदिरात देवीचा गोंधळ कार्यक्रम होणार आहे. रुपीनगर येथील श्री बोल्हाईदेवी मंदिरात दररोज आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सार्वजनिक मंडळांची देखील मंडपबांधणी पूर्ण झाली आहे. शहरासह उपनगरांतील चौकांत तसेच लॉन्समध्ये दांडिया-गरबा, ऑर्केस्ट्रा, रंगबिरंगी रोषणाई अशा दिमाखदार आयोजनामुळे आजपासून तरुणाई दांडियाच्या तालावर थिरकण्यास सज्ज झाली आहे. धार्मिकता, पावित्र्य तसेच दांडिया-गरबामुळे शहर उत्साहात न्हाऊन निघणार आहे.
झेंडू खातोय भाव
नवरात्रोत्सवाला सोमवारी (दि. 21) सुरुवात होत असून, फुलबाजारात झेंडूच्या फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. बाजारात देशी पिवळा गोंडा (झेंडू) आणि केशरी कलकत्ता (गोंडा) यांना मागणी वाढली आहे. यामध्ये कलकत्ता गोंडा 150 ते 200 रुपये किलो दराने विक्री केला जात होता.
नवरात्रीमुळे फुलांची मागणी वाढल्याने फुलांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. नवरात्रोत्सवामध्ये घराघरांत तसेच मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. फुलबाजारात विड्याची पाने, तुळशीची पाने, कमळाची फुले, झेंडू, शेवंती, बिजलीची फुले यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. झेंडूची फुले 100-150 रुपये किलो दराने विक्री केली जात होती. कमळाचे फूल 40-50 रुपये प्रतिनग विक्री केले जात होते.
दागिन्यांची क्रेझ
पारपंरिक पोशाखाबरोबर पारंपरिक दागिने देखील आलेच. घागरा-चोलीवर विशेषकरून ऑक्साइड ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे शहरातील दुकानात खास नवरात्रीसाठी स्पेशल असा ऑक्साइड ज्वेलरीचा स्टॉक पाहायला मिळत आहे. तसेच, कवड्यांपासून बनविलेल्या ज्वेलरीचा देखील पर्याय उपलब्ध आहे.