पिंपरी: नवरात्रीसाठी दांडियाच्या तालावर ताल धरायला तरुणाई सज्ज झाली आहे. नवरात्रीत नक्की कोणते आऊटफिट घालावे यासाठी बाजारात पर्याय शोधत आहेत. नवरात्रीमध्ये पारंपरिक पोषाखाबरोबर काहींचा पारंपरिक वेस्टर्न असा एकत्रित फ्युजन लूक करण्याकडे कल दिसून येत आहे.
बाजारपेठेत कच्छ, गुजरात, बंजारा, इक्कत यातील घागरा चोलीचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मिरर वर्क, मेटल वर्क, धागा वर्क, गोंडे असलेले, चिकनकारी, फुलकारी घागरा पहायला मिळतात. इक्कत, बांधणी प्रिंटमधील सिंपल घागरेदेखील उपलब्ध आहेत. (Latest Pimpari chinchwad News)
गणपतीनंतर आता वेळ आहे नवरात्रीत देवीचा जागर करण्याची. पण देवीच्या भक्तिबरोबरच नवरात्रीत उत्साह असतो तो गरबा आणि दांडियाचाही. नवरात्रीमध्ये खेळला जाणारा दांडिया हा महाराष्ट्रातही हौसेने खेळला जातो. सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या प्रमाणात रास दांडिया आणि गरबाचे आयोजन केले जाते. यानिमित्त स्पर्धाही भरविण्यात येतात. त्यामुळे हटके लूक करण्याची तरूणाईची धडपड सुरू आहे.
सगळीकडे रंगीबेरंगी लाईट्स आणि सुंदर नवरात्री स्पेशल लुक्समधील गरबा नृत्य करणाऱ्यांना पाहून उत्सवाला खरा रंग चढतो. गरबा किंवा दांडियाला जाताना प्रत्येकीचीच इच्छा असते की आपण हटके आणि आकर्षक दिसावं. त्यामुळे अनेक दिवस आधीच अनेकींची तयारी सुरू होते. काहीजणी नवरात्रीत ट्रेडिशनल लुकला पसंती देतात तर काहीजणी फ्युजन लुकला.
जर तुम्हाला कुर्ताही घालायचा नसेल तर तुम्ही जीन्स आणि कॉटन शॉर्ट कुर्ती किंवा शर्टवर असं हेवी जॅकेट घालू शकता. यावरही तुम्ही थोडा फ्युजन लूक देण्यासाठी चेन असलेले किंवा हेवी झुमके घालू शकता. अजून पारंपरिक टच देण्यासाठी भरपूर मेटल बांगड्याही घालू शकता.
पुरुषांसाठी केडियावर जॅकेट
नवरात्रीच्या फॅशनमध्ये पुरुषांसाठी केडियावरदेखील हे जॅकेट खूपच स्टायलिश लूक देतात. रेम्बो कलरमधील अशा प्रकारचे आऊटफिट्स तुम्ही घातल्यास गरबा नाईटला तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष नक्कीच वेधलं जाईल.
इक्कत जॅकेट
हे जॅकेटदेखील खूपच सिंपल आणि छान लूक देतात. त्यासोबत घातलेल्या पारंपरिक ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीने अगदी नवरात्रीच्या गरब्यात उठून दिसेल यात नवल नाही. याचबरोबर कलमकारी, चिकनकारी, फुलकारी आदी जॅकेट्नादेखील मागणी असते.
पोशाख भाड्याने घेण्यासाठी गर्दी
अवघ्या तरुणाईला साद घालणारा हा उत्सव आता काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे उत्सवाची चाललेली जय्यत तयारी तर विचारायलाच नको. हे पोशाख भाड्याने देखील मिळत असल्याने पोशाखांना मागणी आहे. 500 ते हजार रुपयांपर्यंत ड्रेस भाड्याने मिळत आहेत.
लहानांसाठीदेखील पर्याय
बाजरात मोठ्यांबरोबर लहान मुलांसाठीदेखील पर्याय उपलब्ध आहेत. अगदी एक वर्षाच्या मुलापासून केडीया व घागरा चोली उपलब्ध आहेत. हल्ली प्रत्येक उत्सवासाठी फोटोसेशन केले जाते. मुलांकरिता हौसेने हे पोशाख घेण्याकडे पालकांचा कल आहे.
कच्छी वर्क किंवा मिरर वर्क
एखाद्या कलरफुल किंवा व्हाईट कुत्र्यावर कच्छी वर्क किंवा मिरर वर्क असलेलं हा जॅकेटदेखील खूप खरेदी केले जातात. हा लूक तुम्ही अगदी पटकन करू शकता आणि सोप्यारितीने कॅरीही करू शकता. यावर तुम्ही ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घालून मस्तपैकी फ्युजन लूक करू शकता.