पिंपरी: नवरात्रोत्सवास आठवडाभराचा कालावधी राहिला असून, त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील मूर्ती कारखान्यांत कारागिरांचे मूर्ती घडविण्याचे काम पूर्ण झाले असून, सद्यस्थितीत मूर्तीला रंगरंगोटी करण्याच्या कामात कारागीर गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
शहरात सोमवार (दि. 22) घटस्थापना होत असल्याने नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. आदिशक्ती माता दुर्गेच्या उपासनेचे पर्व म्हणून नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. (Latest Pimpri News)
नवरात्रीनिमित्त देवीच्या विविधरूपी मूर्ती बनवून तयार झाल्या आहेत. यामध्ये संतोषी माता, सिंहावर बसलेली आंबामाता या रूपातील मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. या मूर्तींच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
रंगरंगोटी करताना डोळ्यातील तेजस्विता, आकर्षकता वाढविण्याचे काम हे खूप कौशल्याचे काम असते. डोळे जितके तेजस्वी तितकी मूर्ती आकर्षक दिसते. शहरामध्ये संतोषी माता आणि आंबामाता या मूर्तींना जास्त मागणी असते.
कारखान्यामध्ये तीन ते चार फुटाच्या मूर्ती घडविल्या आहेत. त्यांना रंगरंगोटीचे काम सुरू आहे.नवरात्रोत्सवासाठी शहरात विविध मंडळांनी तयारीला वेग दिला आहे. मंडप, विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीम, सजावट यांची कामे सुरू झाली आहे.