PCMC Pudhari
पिंपरी चिंचवड

Municipal staff shortage: पाणीटंचाई, अस्वच्छता, खड्डे अन्‌‍ वाढती अतिक्रमणे

मनुष्यबळाअभावी महापालिकेच्या कामकाजात ‌‘खोडा‌’; पाच हजार जागा रिक्त

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: तीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यास पालिकेच्या दैनंदिन कामकाजात वारंवार समस्या निर्माण होत आहेत. परिणामी, शहरात पाणीटंचाई, अस्वच्छता, ड्रेनेज तुंबणे, डासांचा त्रास, दुर्गंधी, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी आदी तक्रारींच्या संख्या वाढल्या आहेत.

तक्रारी तसेच, समस्या सोडवण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. महापालिकेत तब्बल 5 हजार 992 जागा रिक्त असून, त्या जागा न भरल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहर एकूण 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारले आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.

नागरी सुविधा तसेच, दैनंदिन कामकाजात वाढ होत आहे. महापालिका भवनासह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयावर कामाचा ताण वाढ आहेत. त्यात प्रत्येक महिन्यास वयोमानानुसार व स्वेच्छानिवृत्तीने 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत; मात्र त्यानंतर त्या पदाची भरती केली जात नसल्याने 31 मार्च 2026 पर्यंत वर्ग एक ते चारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तब्बल पाच हजार 992 जागा रिक्त आहेत.

अनेक महिने रिक्त राहिलेल्या पदाचा अतिरिक्त भार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर टाकला जातो. स्वत:कडील कामकाज त्यात अतिरिक्त जबाबदारी असल्याने त्यांची तारांबळ उडते. तर, अनेक महिने पदे रिक्त ठेवली जात असल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजांचा खोळंबा होत असून, विकासकामांवर त्यांचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. वाढत्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. त्यात मनुष्यबळ कमी असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.

महापालिकेच्या नवीन आकृतीबंधानुसार एकूण 11 हजार 515 पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ 6 हजार 500 पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. दर महिन्यास 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या जागांवर नोकर भरती होत नसल्याने अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने 1 मार्च 2026 पासून शहर अभियंता हे महत्वाचे पद रिकामे आहे. अनेक पदावर प्रभारी म्हणून अधिकारी काम करत आहेत.

परिणामी, करदात्या नागरिकांना वेळेत नागरी सुविधा उपलब्ध मिळत नाहीत. पाणीटंचाई, अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, ड्रेनेज तुंबणे, डासांचा त्रास, दुर्गंधी, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी, जल प्रदूषण, नालेसफाई आदींसह अनेक तक्रारींची संख्या वाढली आहे. महापालिकेचे सारथी हेल्पलाईन व क्षेत्रीय कार्यालयांकडे तसेच, नगरसेवकांकडे मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याची वेळेत निपटारा होत नसल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनुभवी अधिकाऱ्यांची वानवा

महापालिकेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तसेच, मोजके अधिकारी निवृत्तीच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे गावापासून स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची खड्डान खड्डा माहिती असलेले अनुभवी अधिकाऱ्यांची वानवा निर्माण झाली आहे. परिणामी, भविष्यात शहराच्या विकासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भरणा वाढला

महापालिका आस्थापनेवर तब्बल 5 हजार पदे रिक्त असूनही ती भरली जात नाहीत. महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत व गतीने चालावे म्हणून कंत्राटी पद्धतीने एजन्सीकडून आवश्यक कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जात आहे. सफाई कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय स्टॉफ, डॉक्टर, व्हॉल्वमन, सुरक्षारक्षक, मदतनीस, वॉर्डन आदी कर्मचारी एजन्सीमार्फत महापालिका घेत आहे. अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या 5 हजारांच्या पुढे आहे.

दरमहा 50 जण निवृत्त

महापालिकेत दर महिन्यात 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, राज्य शासनाकडून मंजुरी मिळत नसल्याने त्या रिक्त जागांवर वेळेवर नोकर भरती होत नाही. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता वाढतच चालली आहे. परिणामी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त अनेक कामांची जबाबदारी सोपवली जात आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.

गरजेनुसार प्रत्येक विभागात भरतीचे नियोजन

सर्व विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. गरजेनुसार तातडीने जितके मनुष्यबळे हवे याची माहिती सर्व विभागप्रमुखांकडून मागविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे गरजेनुसार नोकर भरती करण्याचा विचार आहे. त्यासंदर्भातील अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT