पाणीटंचाईचे संकट File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpari Chinchwad : पाणीटंचाईचे संकट ! पाणी जपून वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

महापालिका प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी : तीव्र उन्हामुळे शहरात नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. बोअरवेलचे पाणी आटले आहे. टँकरद्वारे पाणी खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तीव्र उन्हाळा लक्षात घेता ते प्रमाण अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे.

साडेपाच वर्षांपासून शहरवासीयांना दिवसाआड पाणी

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकवस्ती वाढून लोकसंख्या झपाट्याने फुगत आहे. शहराची सध्याची लोकसंख्या 35 लाख असल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. त्या तुलनेत पाणीपुरवठा केवळ 35 टक्क्यांंनी वाढला आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांना वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी संपूर्ण शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या साडेपाच वर्षांपासून शहरवासीयांना दिवसाआड पाणी मिळत आहे.

नागरिकांनी पाण्याची बचत करावी

हाऊसिंग सोसायटीतील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (एसटीपी) सुरू करून ते कार्यान्वित ठेवावेत. तेच पाणी उद्यानात ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. ते पाणी पार्किंग, रस्ते, जिने धुण्यासाठी वापरावे. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा तपासून घ्यावी. तसेच, त्याची दुरुस्ती करावी, पाण्याच्या गळक्या टाक्या दुरूस्त करून घ्याव्यात, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणार्‍या जुन्या सोसायट्यांमध्ये ग्रे वॉटर प्लॅट बसवावा, हॉटेल, मॉल, शाळा यांनी नळाला एरेटर बसवावा, हाऊसिंग सोसायटीधारकांनी सोसायटीमधील पाण्याचे ऑडिट करावे, अनधिकृत नळजोड घेतल्यास आणि पाण्याच्या गैरवापराची माहिती महापालिकेला द्यावी, पाण्याचा टँकर खरेदी पाण्याची गुणवत्ता तपासावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे

व्यापारी संकुलातील एसटीपी बंद असल्यास पाणीपुरवठा बंद करणार

पाणीटंचाई तसेच, पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना केल्या आहेत. विद्युत मोटार पंपाद्वारे थेट नळजोडावरून पाणी खेचल्यास मोटारपंप जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत कनेक्शन जोड खंडित करण्यात येत आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती केली जात आहे. नवीन नळजोड देणे पुढील दोन महिने बंद केले आहे. सांडपाणीप्रक्रिया यंत्रणा (एसटीपी) नसणार्‍या व्यावसायिक संकुलातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. वाहने, रस्ते, पार्किंग, जिने धुण्यासाठी पिण्याच्या पाणी वापर केल्यास कारवाई करण्याचे नियोजन आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

सखल भागात अपुरा पाणीपुरवठा

शहराचे शेवटचे टोक असलेल्या भागांत पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या बारा महिने तक्रारी आहेत. तसेच, सखल भागातही कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. तर, दुसरीकडे बेकायदेशीपणे अनधिकृत नळजोड घेऊन महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरले जात आहे. तसेच, थेट नळाला विद्युत मोटार पंप लावून पाणी खेचले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीपुरवठा अडथळा निर्माण होत आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT