Gas Tanker Accidents Pudhari
पिंपरी चिंचवड

Mumbai Pune Expressway Gas Tanker Accidents: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर अपघातांची मालिका; प्रवाशांत वाढती चिंता

घाट विभागात नियंत्रण सुटल्याने वारंवार दुर्घटना; ज्वलनशील वाहनांसाठी कडक नियमावलीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विशाल विकारी

लोणावळा: मुंबई-पुणे प्रवासाचा जलदगती मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्सप्रेस-वे वर वारंवार होणाऱ्या गॅस टँकरचे अपघात सध्या चिंतेचा विषय बनत आहे. 3 फेब्रुवारी रोजी एक्सप्रेस-वे वर अडोशी बोगद्याजवळ प्रोपलिन नावाचा गॅस वाहतूक करणारा एका टँकरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता. यामध्ये तीन ठिकाणाहून गॅस गळती सुरू झाल्याने तब्बल 36 तास या मार्गावरील वाहतूक ही बंद ठेवण्यात आली होती. त्याच पद्धतीची दुसरी घटना 23 फेब्रुवारी रोजी पुन्हा अमृतांजन पुलाजवळ घडली. यामुळे प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

वाहने बंद पडण्याचे प्रमाण वाढले

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा खालापूर ते लोणावळा हा भाग घाटक्षेत्र म्हणून ओळखला जातो. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येताना घाट चढत असताना अनेकवेळा अवजड वाहने ही गरम होतात. इंजिन गरम होऊन किंवा टायर गरम होऊन अचानक वाहने पेट घेतात व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या अनेक घटना ताज्या आहेत. तर, याच भागामध्ये घाट उतरताना अनेक वेळा इंधन वाचवण्यासाठी अनेक अवजड वाहनांचे चालक वाहने न्यूट्रल करून ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अचानक समोरचे वाहन थांबल्यास अथवा वळण आल्यास, चालक ब्रेक मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यावेळी वाहन थांबत नाही अथवा ते नियंत्रणा बाहेर गेलेली असते, अशा मानवी चुकांमधूनदेखील या भागामध्ये वेगवेगळे अपघात झाल्याच्या घटनांच्या नोंदी आहेत.

या सर्वच अपघाती घटनांच्या पार्श्वभूमीवर व भविष्य काळामध्ये अशा घटना घडल्यानंतर होणारी वाहतूककोंडी व उद्भवणाऱ्या इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून अवजड वाहने व ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एक नियमावली तयार करणे गरजेचे आहे. तसेच, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सुरू होण्याच्या प्रवेशद्वारावरच अशा वाहनाची तपासणी आरटीओच्या माध्यमातून करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

वाहनांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

सुदैवाने या घटनेमध्ये गॅस लिकेज न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जवळपास 21 टन गॅस या टँकरमध्ये होता अतिशय सुरक्षितरित्या टँकर हा मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेपासून दोन किलोमीटर अंतरावर घेऊन जात त्याची दुरुस्ती व तपासणी करण्यात आली. अतिशय ज्वलनशील व जलाग्रही गॅस वाहतूक करणारे टँकर व इतर वाहने या मार्गावरून सातत्याने वाहतूक करत असतात. अतिशय दूर ही वाहने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात. असे असताना त्यांच्या सुरक्षा संदर्भामध्ये नियमावली असणे गरजेचे आहे. एखाद्या महत्त्वाच्या मार्गावर ही वाहने येत असताना, त्यांची योग्य प्रकारे तपासणी करणे तसेच चालकाचीदेखील फिटनेस तपासणी करणे आता महत्त्वाचे बनले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असो अथवा राज्यातील इतर कोणत्याही महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असो या मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या या ज्वलनशील पदार्थांच्या वाहनांची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे.

वाहनांची संख्या वाढली

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा जलद गती मार्ग म्हणून ओळखला जातो. मुंबई-पुणे दरम्यानच्या दहा हजारांहून अधिक वाहनांचे दररोज या मार्गावरून वाहतूक असते. शनिवार, रविवार व सुटीच्या काळामध्ये ही संख्या काही पटीने वाढते. त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या व सातत्याने वर्दळ असलेल्या मार्गावर जेव्हा ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थांची वस्तूंची वाहतूक करणारी वाहने येतात, तेव्हा केवळ या वाहनांचे नाही तर या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनांची व प्रवाशांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातूनदेखील काळजी घेणे गरजेचे बनले आहे. एक्सप्रेस वेचा मोठा भाग हा घाट क्षेत्रातून जातो. तसेच, अनेक ठिकाणी उंच पूल व बोगदेदेखील आहेत. आजपर्यंत या ठिकाणी कोणती घटना घडली नाही, पण न घडो अशी एखादी घटना घडल्यास हा मार्ग काही कालावधीसाठी बंद राहू शकतो. याकरिता महाराष्ट्र शासनाने तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी या सर्वच यंत्रणांनी यावर योग्य ते धोरण ठरवणे गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT