खराळवाडी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खराळवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंपरी येथील शाळेच्या मैदानावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस सुरू असल्याने लालमातीचा चिखल झाल्याने विद्यार्थ्यांना वर्गापर्यंत जाताना कसरत करावी लागत आहे. खेळण्याचा तर विषयच उरला आहे. शाळेत बालवाडीपासून दहावीपर्यंत वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांची वाट बिकट झाल्याने पालकांना काळजी लागून राहिली आहे. आयुक्त साहेब, मुलांनी खेळायचे कुठे, शाळेत जायचे कसे, असा प्रश्न पालकांनी व्यक्त केला.
शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे कठीण झाले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन, शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काही पालकांनी केला. (Latest Pimpri News)
खराळवाडी येथे महापालिकेची प्राथमिक, माध्यमिक व जवळच उर्दू शाळा आहे. सदरील शाळा बालवाडीपासून ते इयत्ता दहावीपर्यंत असल्याने या शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. शाळेच्या मैदानावर मुरुम किंवा खडी टाकून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना प्रवास करता येईल अशी व्यवस्था प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
या ठिकाणी महापालिकेच्या तीन शाळा आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाच्या दोन शाळा एकाच मैदानावर आहेत. ऊर्दू माध्यमाची शाळा जवळच काही अंतरावर आहे; मात्र या परिसरात दोन शाळा असून, शाळेच्या आवारात चिखलाचा राडारोडा पडलेला दिसत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर राडारोडा पसरला आहे. इमारतीसमोरील मैदानावर गाजर गवत, चिखल वाढल्याने डास, माशा, कीटक आदींची संख्या वाढली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या मैदानावर धोकादायक परिस्थितीत राडारोडा पसरल्याने विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यू, थंडीताप, खोकला हे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिखलमय मैदानावरून शाळेत वाट काढत पुढे कसे जायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.
प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तरी येत्या काही दिवसांत चिखल झालेल्या ठिकाणी मुरुम टाकून मैदान व्यवस्थित केले जाईल.- एन. के. भोये, मुख्याध्यापक, महापालिका माध्यमिक शाळा खराळवाडी.
शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यात वाहने मैदानावरून गेल्याने अधिकच राडारोडा झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना वर्गात जाताना तारेवरची कसरत करावी लागते. दलदलमुळे शाळेतील विद्यार्थी आजारी पडण्याचा धोका आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील मैदानावर मुरुम किंवा खडी टाकून व्यवस्थित बनविणे गरजेचे आहे.- कल्याण सिरसाठ, पालक.