पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन डेंगी व मलेरिया आजाराबाबत गेल्या साडेतीन महिन्यांपासून सर्वेक्षण सुरू आहे. त्यात तब्बल 14 हजार 274 घरांत डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
तर, 4 हजार 137 ठिकाणी नोटिसा बजावल्या आहे. एक हजार 142 जणांवर दंडात्मक कारवाई करून 40 लाख 58 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आपल्या घराभोवती डास निर्माण होऊ नये म्हणून पाणी साचू देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Latest Pimpri News)
डेंगी व मलेरिया आजार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध फवारणी, घराघरांत तपासणी, बांधकामस्थळांवरील पाहणी, कंटेनर तपासणी तसेच, जनजागृती कार्यक्रम व दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतून समन्वय साधून याबाबतचा एकत्रित आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होत असून, संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत आहे, असे दावा आरोग्य विभागाने केला आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने 1 जून ते 14 सप्टेंबर या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील 9 लाख 80 हजार 380 घरांची पाहणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 हजार 274 घरांत डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
निवासी घरे, संस्था आदी ठिकाणच्या विविध 51 लाख 84 हजार 972 भांडी, ड्रम, कुंड्या, पाणी साठवणीची ठिकाणे आदींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 15 हजार 407 ठिकाणी डास वाढीस पोषक वातावरण आढळून आले आहे. शहरातील 2 हजार 11 टायर पंक्चर व भंगार दुकानांची तपासून करून तातडीने सुचना करून सुधारणा करण्यास सांगण्यात आले आहे.
दोन हजार 213 बांधकाम साईटची पाहणी करून अस्वच्छता दूर करण्याची कारवाई केली आहे. आजअखेर नोटिसा व दंडात्मक कारवाई : 4 हजार 137 ठिकाणी नोटिसा बजावल्या आल्या आहेत. तर, 1 हजार 142 नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करून एकूण 40 लाख 58 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडून उपाययोजना
महापालिकेने डेंगी व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत. औषध फवारणी, घराघरांत तपासणी, बांधकामस्थळांवरील पाहणी, कंटेनर तपासणी केली जात आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होत आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. त्यामुळे डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो, असे महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.