Moshi Waste to Energy Project Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Waste to Energy Project: मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प महिनाअखेरीस सुरू; रोज १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया

चिमणी दुरुस्तीचे काम सुरू; शहरात यापुढे कचरा डंपिंगची जागा नसणार, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील चिमणी पडण्याची घटना तेथील दुर्घटनेच्या दीड महिन्यापूर्वी पडली. मात्र, ओल्या कचरा कंपोस्ट केला जात होता. दुर्घटनेनंतर तेव्हापासून तो प्रकल्प बंद आहे. चिमणी दुरूस्त करून या महिन्याच्या अखेरीस प्रकल्प सुरू केला जाईल. त्यामुळे दररोज सुमारे 1 हजार टन कचर्‍याची विल्हेवाट लागणार आहे. परिणामी, शहरातील कचरा समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

कचरा समस्येवर झालेल्या चर्चेनंतर ते खुलासा करताना बोलत होते. आयुक्त म्हणाले की, डेपोतील पहिल्या टप्प्यातील बायोमायनिंगचे काम संपत आहे. दुसर्‍यांची मुदत नोव्हेंबरला संपत आहे. उर्वरित कचर्‍यासाठी बायोमायनिंगची नवीन निविदा काढली जाईल. जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ दिली जाणार नाही.

कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी शहरात एकूण बारा जागा निवडलेल्या आहेत. त्या अद्याप अंतिम केल्या नाहीत. सहा जागांवर सुका कचर्‍यावर प्रक्रिया केंद्र असेल. लवकरच निविदा प्रक्रिया राबण्यात येईल. बायो-सीएनजी प्रकल्पासाठी दहा एकर जागा शहरात कोठेच नाही. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठीही जागा शोधत आहोत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 25 एकर जागेची वाट न पाहता, छोट्या जागेत सीएनजी प्रकल्प करण्याचा विचार सुरू आहे. शहरात यापुढे कचरा डंपिंगची जागा असणार नाही. आणखी काही दिवस मोशी डेपोत कचरा टाकावा लागणार आहे. चाळीस वर्षांत करू शकलो नाही, ते 3 महिन्यात होणार नाही. प्रशासनाला आखणी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले.

निलंबित अधिकारी संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात किती वीज निर्मिती केली. किती कचर्‍यांची विल्हेवाट लावली. तसेच, शहरातील सर्व एसटीपीचे ऑडिट केले जाणार आहे. मृत कर्मचारी नागेश गायकवाड यांच्या दोन लहान मुलांना भविष्यासाठी सर्व मदत केली जाईल. कंपनीने शिक्षण व विमा जबाबदारी स्वीकारली आहे. शहरात कचरा डेपो एकच आहे. काही भागात जागा सापडत नाही. काही ठिकाणी इतर भागांत प्रक्रिया करावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कचरा उचलला नाही, याची प्रत्येक आरोग्य निरीक्षकांवरजबाबदारी निश्चित केली आहे. कचरा संकलन गाड्या खराब आहेत. ठेकेदारांवर एफआरआय दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मनुष्यबळ व वाहने वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जून 2027 ची मुदत संपणार असून, नवीन निविदा त्रुटी दूर करून काढली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT