पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोशी कचरा डेपोतील सुका कचर्यापासून वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. मुदतीमध्ये धुराड्याच्या चिमणीचे काम पूर्ण न केल्याने प्रकल्पाचा ठेकेदार अॅन्टोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीला 1 ऑक्टोबरपासून प्रत्येक दिवसाला 50 हजार रुपये दंड करण्यात सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत चिमणी उभारून प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होत नाही, तोपर्यंत हा दंड वसूल केला जाणार आहे.
मोशी कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प डीबीओटी तत्वावर जुलै 2023 पासून सुरू करण्यात आला आहे. दररोज सातशे टन सुका कचरा जाळून त्यापासून 14 मेगा वॅट वीज तयार केली जात आहे. प्रकल्पात जाळला जाणार्या कचर्यातून धूर निर्माण होऊन निर्माण होणार्या वायू प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या प्रकल्पास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर धुराड्याची चिमणी 5 जून 2026 ला पाडण्यात आली. तेव्हापासून हा प्रकल्प बंद आहे. त्यानंतर 8 जुलैला कंपनीची अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून 9 कर्मचार्यांचा मृत्यू झाला. तर,12 कर्मचारी जखमी झाले.
त्या दिवसापासून डेपोत कचरा वाहतूकवाहनांना प्रवेश दिला जात नसल्याने संपूर्ण शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीतून शहर अद्याप सावरलेले नाही. प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित ठेकेदारास दिले होते. ठेकेदाराने 30 सप्टेंबरपर्यंत चिमणीचे काम पूर्ण करून 1 ऑक्टोबरपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत ठेकेदाराने चिमणीचे काम पूर्ण केलेले नाही. एकीकडे हा प्रकल्प बंद असल्याने शहरात कचर्याची समस्या गंभीर झाली आहे.
कचर्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांकडून कचरा समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी ठेकेदारला 1 ऑक्टोबरपासून प्रत्येक दिवसाला 50 हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.
प्रकल्प बंद असल्याने निर्माण झाल्या अनेक समस्या
मोशी कचरा डेपोतील होणारी दररोज 1 हजार टन कचर्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया थांबली आहे. प्रकल्पात दररोज 14 मेगा वॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. चार महिन्यांत तब्बल 1 लाख 20 हजार टन कचर्याची मोशी डेपोत भर पडून, कचर्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. वीजनिर्मिती होत नसल्याने महापालिकेवर वीजबिलाचा भार वाढला आहे. तसेच, संपूर्ण शहरात कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
मुदतीमध्ये चिमणी उभारण्यास ठेकेदाराला अपयश
मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची चिमणी सुरू करण्याबाबत संबंधित ठेकेदाराने सप्टेंबरअखेरपर्यंतची मुदत मागितली होती. मात्र, या मुदतीत प्रकल्प सुरू करण्यास ठेकेदाराला अपयश आले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार ठेकेदाराला प्रतिदिन 50 हजार रुपये दंड आकारण्यास सुरूवात केली आहे, असे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता विनय ओहोळ यांनी सांगितले.