Moshi Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Waste Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत कारवाईचा बडगा; मुख्य अभियंत्यांसह दोन अधिकारी निलंबित, फायर एनओसी देणाऱ्यावरही टांगती तलवार

नऊ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका; मंजूर आराखडा, प्रत्यक्ष बांधकाम आणि अग्निशमन परवानगीतील विसंगती समोर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कर्मचार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, अनेक कर्मचारी जखमी झाले. त्याप्रकरणी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष भेट न देता फायर एनओसी (ना हरकत दाखला) देऊन हलगर्जीपणा केल्याचा ठपका अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना आयुक्तांनी दाखवा नोटीस बजावण्यात असून, त्या प्रकरणी त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 17 जुलैला बजावलेल्या नोटिशीनुसार, मोशी कचरा डेपोतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीला सन २०१९ मध्ये तात्पुरती फायर एनओसी देण्यात आली. त्यानंतर २६ जुलै २०२३ ला बांधकाम परवानगी विभागाने सुधारित नकाशा मंजूर केला. या मंजुरीनुसार केवळ तळमजल्याच्या (जी प्लस शून्य) ५००.५९ चौरस मीटर बांधकामास परवानगी होती.

मात्र, त्याच दिवशी अग्निशमन विभागाकडून जी प्लस टू मजली व १,०५६. ६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या इमारतीस अंतिम फायर एनओसी देण्यात आली. मंजूर आराखडा, प्रत्यक्ष बांधकाम आणि अग्निशमन विभागाची मंजुरी यातील विसंगतीची कोणतीही पडताळणी न करता अंतिम एनओसी देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयुक्तांनी नोटिशीत नमूद केले आहे. सुधारित मंजूर नकाशा आणि प्रत्यक्ष उभारलेल्या इमारतीत मोठी तफावत असतानाही ती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आली नाही. परिणामी, पहिला व दुसरा मजला अनधिकृतपणे उभारला गेला. सुरक्षाविषयक नियमांचे पालन न झाल्यामुळेच ८ जुलैला ती अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नऊ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात ऋषिकांत चिपाडे यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम तसेच, राष्ट्रीय बांधकाम संहितेतील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नोटिशीवर चिपाडे यांनी आयुक्तांकडे सोमवार (दि. २०) खुलासा सादर केला आहे. तो खुलासा प्रशासनाने अमान्य केला असून, त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

बांधकाम विभागाच्या दोषी अधिकार्‍यांवर अद्याप कारवाई नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील जागेत बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष करून दोन मजली इमारत बांधण्यात आली. तसेच, कचर्‍याच्या डोंगरापसून ३० मीटर अंतरावर इमारतीचे बांधकाम न करता ती इमारत धोकादायकरित्या कचर्‍याच्या डोंगराजवळ बांधण्यात आली. त्या इमारतीच्या तळमजल्यास परवानगी देणारे, पहिल्या व दुसर्‍या मजल्याच्या अधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम परवानगी विभाग, अतिक्रमण विरोधी विभाागाचे अधिकारी तसेच, बीट निरीक्षकावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच, बांधकाम करणारा ठेकेदार, आर्किटेक्ट व सल्लागार यांच्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT