मोशी: परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने थैमान घातले असतानाच मोशीतील आदर्शनगर येथील एका उच्चशिक्षित विवाहितेचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पल्लवी गणेश हिंगे (वय ३६, रा. आदर्शनगर, मोशी) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी (दि. २७) चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
ऐन सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मोशी परिसरावर शोककळा पसरली असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेल्या पल्लवी हिंगे यांना पंधरा दिवसांपूर्वी तीव्र तापाची लक्षणे जाणवू लागल्याने चिंचवड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तेथे तपासणीअंती त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली आणि मंगळवारी त्यांची डेंग्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगी असा परिवार आहे.
कचरा डेपोच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त
मोशी परिसराच्या अगदी नजीक महापालिकेचा कचरा डेपो असल्याने येथे वर्षभर दुर्गंधी आणि डासांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव असतो. त्यातच परिसरातील अनेक रिकाम्या भूखंडांवर, रस्त्यांच्या कडेला आणि उघड्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत असूनही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित औषध अथवा धूरफवारणी केली जात नाही.
प्रशासनाची बघ्याची भूमिका
परिसरात साथीचे आजार वेगाने पाय पसरत असतानाही महापालिका प्रशासन सुस्त बसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. नियमित औषध फवारणीसाठी नागरिकांना आरोग्य विभागाकडे वारंवार खेटे मारावे लागतात आणि दूरध्वनीवरून सतत पाठपुरावा करावा लागतो.
तेव्हा कुठे एखाद-दुसऱ्या भागात नाममात्र फवारणी केली जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. पालिकेच्या या निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत, प्रशासनाने आतातरी बघ्याची भूमिका सोडून संपूर्ण मोशी परिसरात तातडीने जंतुनाशक औषध फवारणी व साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.