पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे 700 बेडचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची नऊ मजली पर्यावरणपूरक इमारत बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत 35 टक्के काम झाले असून, पुढील वर्षांअखेर इमारत बांधून तयार होणार आहे. त्यानंतर काही महिन्यात तेथे प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार सुविधा दिल्या जाणार आहेत. (Pcmc Latest News)
मोशी आणि परिसरातील 10 किलोमीटर अंतराच्या परिघातील नागरिकांना माफक दरात वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून हे रूग्णालय बांधण्यात येत आहे. या 340 कोटी खर्चाची वर्क ऑर्डर डिसेंबर 2023 ला देण्यात आली आहे. प्रत्यक्ष काम मार्च 2024 ला सुरू झाले आहे. कामाची मुदत 3 वर्षे आहे.
जिल्हाधिकार्यांकडून 15 एकर गायरान जागा महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. त्यापैकी 2.5 एकर जागेत हे रूग्णालय बांधण्यात येत आहे.
एकूण 57 हजार 450 चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्र आहे. इमारत तळमजला अधिक आठ मजली उभारण्यात येत आहे. त्यात तीन विंग आहेत. सद्यस्थितीत तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून, तिसर्या मजल्यापर्यंतच्या बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. काम डिसेंबर 2026 ला पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर फर्निचर व वैद्यकीय यंत्रसामुग्रीची जोडणी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार सेवेला सुरूवात करण्याचे नियोजन आहे.
या रूग्णालयामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचार माफक दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संत तुकारामनगर, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयावरील ताण कमी होणार आहे, असे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
रुग्णालयाचे बांधकाम हे ईडीजीईच्या मानांकनानुसार पर्यावरणपूरक आहे. एकूण 200 केएलडी क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी व ईपीटी) आहे. तसेच, 200 किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनेल बसविण्यात येणार आहे. त्याद्वारे निर्माण झालेली वीज रूग्णालयात वापरण्यात येणार आहे. रूग्णालयात नैसर्गिक सूर्यप्रकाश असणार आहे. पावसाळी पाण्याचे संकलन केले जाणार आहे. सेंसरसह एलईडी लाईट, एएसी ब्लॉक बांधकाम, सेंद्रिय कचरा प्रक्रिया यंत्रणा असेल. पीएसए ऑक्सिजन जनरेटर व पन्युमॅटीक ट्युब सिस्टीम (पीटीएस)ची सोय असणार आहे. अग्निसुरक्षा उपाययोजनेत प्री-अॅक्शन सिस्टिम, फायर कर्टन, सीओटू सेन्सर्स, स्ट्रेचर रॅम्प, सुसंगत आपत्कालीन मार्ग आहेत.
रुग्णालयात आपत्कालीन सेवा, ओपीडी, रेडिओलॉजी, डायग्नोस्टिक, बन वॉर्ड, बालरोग, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, डे केअर या सारखे विभाग असणार आहेत. सर्वात वरील मजल्यावर आयसीयू, डायालिसिस, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, वॉर्डस, स्पेशल रूम्स असतील. आठव्या मजल्यावर कर्मचार्यांचे निवास, लेक्चर हॉल व डॉरमिटरीची सुविधा असेल. निवासासाठी एकूण 16 रूम असणार आहेत. येथे 274 चारचाकी व 250 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असणार आहे. भविष्यात उर्वरित जागेत 200 बेडचे कर्करोग (कॅन्सर) रुग्णालय बांधण्याचे नियोजन आहे. तसेच, 150 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय (पीजी, नर्सिंग, फिजिओथेरपीसह सुरू करण्याचा विचार आहे. तसेच, निवासी इमारतींचे नियोजन आहे. मुदतीमध्ये रुग्णालय उभारणार महापालिकेकडून मोशी येथे उभारले जाणारे 700 बेडचे रुग्णालय म्हणजे शहरातील आरोग्य क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. वाढत्या लोकसंख्येला आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. वैद्यकीय शिक्षण, आपत्कालीन सेवा आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधत हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.