पिंपरी: मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर एकाचवेळी अनेक आव्हाने उभी केली. दुर्घटनेनंतर बचावकार्याला मदत, घटनास्थळी जमणारी नातेवाईक व नागरिकांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि दुसरीकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची तयारी अशा तिहेरी जबाबदाऱ्या पोलिसांना एकाचवेळी पार पाडाव्या लागल्या.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः धावपळ करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बुधवार (दि. ८) दुपारी मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱ्याचा डोंगर कोसळल्यानंतर पोलिस यंत्रणा काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाली.
सुरुवातीला संपूर्ण परिसर रिकामा करून बचाव पथकांना मार्ग मोकळा करून देणे, आपत्कालीन वाहने आणि जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करणे, तसेच घटनास्थळी अनावश्यक गर्दी होऊ न देणे, ही मोठी जबाबदारी पोलिसांनी पार पाडली.
दुर्घटनेची माहिती समजताच अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचू लागले. आपल्या नातेवाईकांबाबत माहिती मिळविण्यासाठी प्रत्येकजण व्याकूळ झाला होता.
अशा भावनिक वातावरणात पोलिसांना एका बाजूला नातेवाईकांची समजूत काढावी लागत होती, तर दुसऱ्या बाजूला बचावकार्याला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागत होती. काही वेळा नातेवाईक ढिगाऱ्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना सुरक्षित अंतरावर थांबविण्याचे कामही पोलिसांनी संयमाने केले.
घटनास्थळी एनडीआरएफ, भारतीय सैन्य, महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग आणि इतर यंत्रणांचे शेकडो कर्मचारी कार्यरत होते. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखणे, यंत्रसामग्रीची ये-जा सुरळीत ठेवणे, परिसरात सुरक्षा व्यवस्था कायम ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, ही महत्त्वाची जबाबदारीही पोलिसांनी सांभाळली.
मोशी परिसरातील रस्त्यांवर बचावकार्यासाठी क्रेन, जेसीबी, डंपर, रुग्णवाहिका आणि इतर वाहने दाखल होत होती. वाहतूक शाखेने बचाव पथकांची वाहने कोणत्याही अडथळ्याशिवाय घटनास्थळी पोहोचावीत, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांच्यासह सहपोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच विविध पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक यांनी घटनास्थळी भेटी देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते. बचाव पथके, महापालिका, एनडीआरएफ, भारतीय सैन्य आणि इतर यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच नातेवाईकांना माहिती देणे, सुरक्षा व्यवस्था राखणे आणि बचावकार्य सुरळीत सुरू राहील, यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतः देखरेख करत होते.