पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा मोशी कचरा डेपोत जमा केला जातो. तेथे जमा झालेला 25 ते 30 वर्षांपूर्वीच्या कचर्याच्या डोंगराची बायोमायनिंगद्वारे विल्हेवाट लावली जाणार आहे. त्या कामाच्या दुसर्या टप्प्यातील खर्च 105 कोटी रुपये होता. तो खर्च आता 142 कोटी 45 लाखांवर नेण्यात आला आहे. डेपोतील कचर्याचे डोंगर 12 नोव्हेंबर 2026 पर्यंत नष्ट करण्यासाठी हा वाढीव खर्च करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. 8) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या वाढीव खर्चास मान्यता दिली आहे. बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप तसेच, विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. (Latest Pimpri News)
संपूर्ण शहराचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोतील 81 एकर जागेत जमा केला जातो. तेथे गेल्या 25 ते 30 वर्षांपासूनचा कचरा साचला आहे. त्यामुळे तेथे कचर्याचे डोंगर तयार झाले आहेत. तो कचरा हटविण्यासाठी पहिल्या टप्प्यात 42 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला.
त्यात 8 लाख क्युबिक कचरा हटविण्यात आला आहे. आता दुसर्या टप्प्यातील 105 कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. त्यात 15 लाख क्युबिक कचरा हटविण्यात येत आहे. ते काम सेव्ह इन्व्हायर्मेंट मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनिअरींग प्रा. लि. आणि बी. व्ही.जी. इंडिया प्रा.लि. या दोन ठेकेदार एजन्सी करीत आहेत.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत मिळाले साडे 27 कोटींचे अनुदान
या कामासाठी महापालिकेस स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत 27 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. बायोमायनिंगद्वारे कचरा डेपोतील 8 एकर जागा मोकळी होणार आहे. त्या जागेत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ती कामे स्वच्छ भारत अभियानाची ऑक्टोबर 2026 ची मुदत संपण्यापूर्वी पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे महापालिकेने त्या दोन ठेकेदारांकडून उर्वरित 25 टक्के वाढीव काम करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे बायोमायनिंगचा खर्च 37 कोटी 45 लाख रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एकूण खर्च 142 कोटी 45 लाख रुपयांवर पोहोचला आहे. त्यात एकूण 20.35 लाख क्युबिक कचर्याची विल्हेवाट ऑक्टोबर 2026 पर्यंत लावली जाणार आहे, असा दावा पालिकेच्या अधिकार्यानी केला आहे. त्या वाढीव खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
नाले कामास मान्यता
पिंपळे निलख व इतर परिसरातील नाल्यांची स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक 19 मधील कुकी नाला दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. महापालिकेचे रस्ते, उद्यान, मोकळ्या जागा याठिकाणी लागवडीसाठी वृक्षारोपणाची रोपे पुरविली जाणार आहेत. वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर संस्थेत नव्या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक शुल्क अदा केले जाणार आहे, या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.