मोशी: चिखली परिसराकडे जाणारा चिखली-आकुर्डी या मुख्य रस्त्याबरोबर देहू-आळंदी रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेकदा किरकोळ अन् गंभीर अपघात घडल्यानंतरही चालकांचा बेशिस्तपणा थांबलेला नाही. वाहतूक पोलिस असतानाही वाहनचालक त्यांच्याशी हुज्जत घालतात.
मोई फाटा, डायमंड चौक याठिकाणी ज्या पद्धतीने वाहतूककोंडी कमी केली, तशीच या चौकात होणे अपेक्षित आहे. त्यानुसार, वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासन आणि स्थानिक राजकीय पदाधिकारी यांच्या संयुक्त नियोजनानुसार ही समस्या मार्गी लावणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चिखली परिसराकडे जाण्यासाठी चिखली - आकुर्डी; तर मोशी आणि देहूकडून येण्यासाठी देहू - आळंदी हा मुख्य रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर दररोजच तासनतास वाहतूककोंडी झालेली पाहावयास मिळते. रुंदीकरणासाठी चिखली - आकुर्डी रस्त्यावरील अतिक्रमणे सहा महिन्यांपूर्वीच हटविण्यात आली. मात्र, अद्याप रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नाही. साने चौकात मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती तसेच चिखली - आकुर्डीकडून येणाऱ्या वाहनांमुळे दररोजच कोंडी होत असते.
नेवाळे वस्ती ते घरकुल सोनवणे वस्तीमार्गे तळवडे आणि चिखली गावाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होते. वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. अनेकदा वाहतूक पोलिस असतानाही बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने मनो एन्ट्रीफमधून वाहने घुसवून कोंडीमध्ये भर घालतात. नेवाळे वस्ती परिसरामध्येही कोंडी नित्याची बाब होऊन बसली आहे.
मुख्य चौकात कोंडी नित्याची
देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर सकाळ, सायंकाळ तर दररोजच वाहनांच्या दोन-दोन किलोमीटर रांगा पाहावयास मिळतात. चिखलीगाव येथील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रक दिवे आहेत. मात्र, नियम पाळण्याची तसदी कोणीही घेत नाही. पाटीलनगर किंवा चिखली गावठाणाकडे जाण्यासाठी रहिवाशांना मोठी कसरत करावी लागते. याच रस्त्यावर अनेक भाजी विक्रेते अनधिकृतपणे हातगाड्या उभ्या करून वाहतूक कोंडीला हातभार लावत असतात.
सकाळच्या वेळेत मुलांना शाळेत सोडवायला जाताना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते. वाहतूककोंडी, विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्या यामुळे अपघाताची भीती वाटते. कधी-कधी मुलांना शाळेत वेळेवर पोहचवताना उशीर होतो.प्रतिभा चौधरी, गृहिणी
डायमंड सर्कल, मोई फाटा पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त उभा राहून केला. काही ठिकाणी उपाययोजना करताना काही अडथळे आहेत. त्यावर काम करणे सुरू आहेत.रामचंद्र घाडगे, वरिष्ठ निरीक्षक, तळवडे वाहतूक विभाग