पिंपरी चिंचवड

Moshi Accident : सुनील कोरके अजूनही बेपत्ता; ८ महिन्यांच्या बाळाला आणि पत्नीला फक्त त्यांच्याच भेटीची आस!

प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही; बेपत्ता सुनील कोरके यांच्या नातेवाईकांचा घटनास्थळी आक्रोश

पुढारी वृत्तसेवा

मोशी : येथील कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेला काही तास उलटून गेले तरी, येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले सुनील कोरके यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपले कर्तव्य बजावणारे सुनील कोरके या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मूळचे पंढरपूरजवळील करकंब येथील रहिवासी असलेले सुनील हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी चिंचवड येथे आपल्या लहानशा कुटुंबासह स्थायिक झाले होते. मात्र, एका क्षणात घडलेल्या या घटनेने त्यांच्या हसत्या-खेळत्या संसाराला मोठा धक्का दिला आहे.

सुनील यांचे चुलत भाऊ चेतन कोरके यांनी त्यांच्या आयुष्यातील भावूक प्रवास सांगितला. सुनील यांचे आई-वडील आणि जुळा भाऊ पंढरपूरला राहतात, तर सुनील कामासाठी शहरात आले होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या सुनील यांच्या लग्नाला १० वर्षे झाली होती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकताच त्यांच्या घरात पाळणा हलला होता. त्यांच्या अवघ्या ८ महिन्यांच्या लहान बाळाच्या येण्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.

चिंचवड येथील घरात ते आपल्या पत्नी आणि बाळासोबत सुखाचा संसार करत होते. मात्र, मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेने या सुखी कुटुंबाला मोठा धक्का दिला आहे. आज ते ८ महिन्यांचे निष्पाप बाळ वडिलांच्या मायेसाठी आणि त्यांची पत्नी डोळ्यांत आसवे घेऊन सुनील यांची आशेने वाट पाहत आहेत.

या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांचे मित्र आणि इतर नातेवाईक तातडीने घटनास्थळी आणि त्यांच्या घरी पोहोचले. सुनील यांचे चुलत बंधू चेतन कोरके यांच्यासह संपूर्ण कुटुंब सध्या मानसिक धक्क्यात आहे. कचरा डेपोच्या या ढिगाऱ्याखाली आणि परिसरात शोधकार्य वेगाने सुरू असले, तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. एका निष्पाप कर्मचाऱ्याचा जीव असा टांगणीला लागल्याने संपूर्ण परिसरात आणि त्यांच्या मित्रपरिवारात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT