Military Dairy Farm Flyover Pudhari
पिंपरी चिंचवड

Military Dairy Farm Flyover: मिलिटरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे काम संथ; ठेकेदारावर कारवाई

85 टक्के काम पूर्ण; भाववाढीचा निर्देशांक गोठवला, 1 सप्टेंबरपासून दररोज एक हजार रुपये दंड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथे पुणे-लोणावळा लोहमार्गावर उड्डाण पूल बांधण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे स्थापत्य विभागाने त्या ठेकेदारावर कारवाईचा बडगा उचलला आहे. कामाच्या भाववाढीचा निर्देशांक गोठवून, ठेकेदाराला दिवसाला एक सप्टेंबरपासून दिवसाला एक हजार रुपये दंड सुरू करण्यात आला आहे.

टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा. लि. असे त्या ठेकेदार कंपनीचे नाव आहे. पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव, पिंपळे सौदागर, रहाटणी या भागास जोडण्यासाठी हा उड्डाण पूल संरक्षण विभागाच्या जागेत उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या क्रॉसिंगवर थांबण्याची गरज राहणार नाही. तसेच, अवजड वाहनेही सुलभपणे ये-जा करू शकणार आहेत.

त्यासाठी पुणे-मुंबई जुन्या महामार्गापासून डेअरी फार्म रस्त्यावर 1 हजार 290 मीटर लांबीचा आणि 17.20 मीटर रुंदीचा 65 कोटी 28 लाख रुपये खर्चाचा उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. कामास टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा. लि. कंपनीने 31 मार्च 2023 ला सुरुवात केली. पुलाच्या कामासाठी अडथळा ठरणारी झाडे काढणे. तसेच, रेल्वे विभागाकडून विविध परवानग्या मिळण्यास विलंब झाल्याने हे काम दोन वर्ष मुदतीमध्ये म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण झालेले नाही.

स्थापत्य प्रकल्प विभागाने संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. तीन वेळा तब्बल 17 महिन्यांची मुदतवाढ देऊनही काम 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण न झाल्याने ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत केवळ 85 टक्के काम झाले आहे. एक ऑगस्टपासून भाववाढीचा निर्देशांक गोठवण्यात आल्याने ठेकेदाराला दरवाढ मिळणार नाही. तर, एक सप्टेंबरपासून दरदिवशी 1 हजार रुपये दंड करण्यात येत आहे. संपूर्ण काम संपेपर्यंत हा दंड आकारला जाणार आहे.

मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्याने कारवाई

तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा. लि कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून भाववाढीचे निर्देशांक गोठवण्यात आला आहे. एक सप्टेंबरपासून प्रत्येक दिवसाला 1 हजार रुपये दंड आकाराला जात आहे, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय भोजने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT