हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: जलद , सुरक्षित तसेच वाहतूककोंडीविरहीत सेवा म्हणजे मेट्रो सेवा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. मेट्रो सेवेमुळे प्रवाशांना पुण्यात पोचण्यासाठी तासाचा वेळ मिनिटांवर आला आहे. त्यामुळे शहरातून नोकरीनिमित्त तसेच कामानिमित्त दररोज पुणे गाठणाऱ्या प्रवाशांचा कल मेट्रोकडे वाढला असून, वर्षभरात पीएमपीच्या प्रवासी संख्येत साधारण साडे सहा लाखांनी घट झाल्याचे आकडेवारीवरुन निदर्शनास येत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी नाळ पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा होय. दररोज लाखोंच्या घरात प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात. गर्दीने पीएमपीच्या बसगाड्या हाऊसफुल्ल धावतात; मात्र पिंपरी-चिंचवडमधून पुण्यापर्यंत मेट्रोसेवा सुरू झाल्याने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधील पीएमपीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे.
मार्च 2022 मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारी जलद, वेगवान महामेट्रो सेवा पिंपरी ते स्वारगेटदरम्यान सुरू झाली. मेट्रोमुळे पीएमपीची प्रवासी संख्या घटली. जानेवारी ते सप्टेंबर 2024 मध्ये 1 कोटी 3 लाख सत्तर हजार 941 प्रवाशांनी पीएमपी बसमधून प्रवास केला आहे. तर याच कालावधीत यावर्षी 97 लाख 25 हजार 656 प्रवाशांनी पीएमपीचा लाभ घेतला. केवळ मेट्रो सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी पीएमपीला नाकारले नसून, बसचालक- वाहकांकडून मिळणारी उद्धट वागणूक, तिकीट दरात झालेली वाढ, वाढते बेकडाऊन, बस वेगात दामटवणे, वेळेत मार्गांवर गाड्या न सोडणे अशा विविध कारणे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत.
ही आहेत प्रमुख कारणे
पीएमपीचे तिकीट मेट्रोपेक्षा जास्त
वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला विलंब
वेळेवर मार्गांवर बसगाड्या न सोडणे
बेकडाऊन वाढते प्रमाण
खिळखिळ्या गाड्या मार्गांवर सोडणे
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. प्रवाशांना पास सुविधा, पीएमआरडीए हद्दीत बससेवा सुरू केली आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तसेच लवकरच पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसगाड्या दाखल होणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होऊ शकेल.यशवंत हिंगे, वाहतूक नियंत्रक