Ganeshotsav DJ Culture Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Ganesh Visarjan DJ: मावळात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणार की नाही?; मंडळांसह डीजे व्यावसायिकांची उत्सुकता

पोलिसांचा स्पष्ट इशारा—विनापरवानगी डीजे वाजविल्यास गुन्हा; पारंपरिक वाद्यांना मात्र परवानगी

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडेसह मावळ परिसरात सार्वजनिक श्रीगणेश विसर्जन आज रविवारी (दि. २०) असून विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू आहे. आता अनेकांचे लक्ष डीजे वाजविला जाणार की नाही यावर आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवापूर्वी गणेश उत्सवाबाबत मिटींग आयोजित केली होती. या वेळी परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, महिला दक्षता समिती आणि शांतता कमिटीचे सदस्य, गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.

या वेळी पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, गणेश उत्सव काळात डीजे वाजवू नका. डीजेला परवानगी नाही. तरी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. डीजेची बुकींग केले असेल तर रद्द करा, कोणत्याही परीस्थितीत डीजे वाजविण्यास परवानगी मिळणार नाही. जर कोणी डीजे वाजविला तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.

काही मंडळांकडून नाराजी

गणेश आगमनापासून आजतागायत कायद्याचे पालन करून डीजे वाजविण्यात आलेले नाहीत; परंतु विसर्जन मिरवणुकीत डीजेबाबत काय, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. काहींना वाटते की डीजे वाजवावा तसेच मोठ्या प्रमाणावर दिलेली आगाऊ रक्कम बुडण्याची शक्यता असल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय प्रशासनाने जून, जुलैमध्येच सांगावयास पाहिजे होता. आम्ही आगाऊ रक्कम दिलीच नसती. इतर वेळेस डीजे लावला जातो; मग गणेश उत्सवास का नाही. असे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काही कार्यकर्त्यांनी पुढारी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

विनापरवानगी डीजे वाजवू नये

काहींना वाटते की डीजे लावू नये, यामुळे प्रदूषण होते, रुग्णांना, वृद्धांना, पक्ष्यांना त्रासदायक होते आदी कारणांमुळे डीजे लावू नये. ऐनवेळी परवानगी मिळेल अशी आशा अनेकजणांना आहे. काहीही असले तरी परवानगी मिळाली नाही तर डीजे लावू नये. विनापरवानगी डीजे लावला तर गणेश उत्सव कार्यकर्त्यांना कायदेशीर बाबीस सामोरे जावे लागेल. यामध्ये तरुणाई भरडली जाईल. डीजे व्यावसायिकांसह अनेकांचे लक्ष यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविला जाणार की नाही, यावर आहे, हे मात्र नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT