Talegaon Election Result Postponed Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Election Result Postponed: नऊ वर्षांनंतर निवडणुकीची जत्रा अन् विघ्न सतरा! मावळात मतदार, उमेदवारांच्या नाराजीचा फुटला बांध; निकाल १९ दिवस लांबणीवर

तळेगावमध्ये 'सावळा गोंधळ' तर लोणावळ्यात २ जागांची निवडणूक स्थगित; ईव्हीएम असूनही निकाल २१ डिसेंबरला, कर्मचारीही वैतागले.

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे : नऊ वर्षांनंतर निवडणुकीची जत्रा अन विघ्न सतरा, अशी हेळसांड होत गेलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात आज झालेल्या मतदानाची मोजणी लगेच होणार नाही.

निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या जागांचे मतदान 20 डिसेंबरला झाल्यानंतरच एकत्रित मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरात काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यानंतर त्यावर आक्षेप आणि कायदेशीर पेच निर्माण झाल्याने आयोगाने स्थगितीचे आदेश जारी केले होते, त्यात तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सहा जागांचा समावेश आहे. त्यामुळे नगर सदस्य पदांच्या दुसऱ्या टप्प्यात या जागांसाठी 20 तारखेला मतदान होण्याची शक्यता आहे.

ईव्हीएम आल्यानंतर मतदान, मतमोजणी आणि निकाल ही प्रक्रिया 48 तासांच्या आत झटपट होत असे. मात्र राजकीय वातावरण, रणनीती, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आरोप, न्यायालयात धाव आणि निवडणूक आयोगाने दिलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर सारेच नाराज झाले आहेत. त्यात उमेदवार आणि मतदार जास्त नाराज असल्याचे त्यांनी आज पुढारी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलेल्या भावनांमधून समोर आले.

मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेसाठी नगर परिषदेच्या सुमारे 450 ते 500 जणांचा ताफा या निवडणूक प्रक्रियेत नियुक्त करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश दापकेकर आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी पुढारीला सांगितले. 20 तारखेस होणारे मतदान, मतमोजणी आणि निकाल यासाठी पुन्हा एवढे सारे नगर परिषदेचे मनुष्यबळ काम करणार आहे. पुन्हा निवडणूक पुन्हा तेच काम ही वैतागवाडी असल्याची प्रतिक्रिया काही निवडणूक कर्मचारी, महिला पोलिस यांनी बोलून दाखवली.

निकाल लांबल्याने उमेदवारांचा हिरमोड !

वडगाव मावळ : राज्य निवडणूक आयोगाने अपील दाखल असलेल्या नगर परिषदेची निवडणूकप्रक्रिया स्थगित केल्यानंतर आज पुन्हा न्यायालयाने राज्यातील सर्वच नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचा आदेश दिल्याने मावळ तालुक्यातील लोणावळा तळेगाव दाभाडे नगर परिषद व वडगाव नगरपंचायत चा निकालही लांबणीवर पडला आहे. त्यामुळे उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

लोणावळा नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब व प्रभाग 10 अ या प्रभागांबाबत न्यायालयात अपील दाखल आहे. त्यामुळे या प्रभागातील मतदानप्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे आज न्यायालयाने राज्यभरातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल थेट 21 तारखेला जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, मावळ तालुक्यातील लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषदच्या काही जागांची निवडणूक स्थगित झाली असली तरी दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपद व इतर प्रभागांसाठी मात्र आज मतदान झाले. तसेच वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व 17 प्रभागातील मतदानप्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदान झाले असूनही निकाल तब्बल 19 दिवस लांबणीवर पडला असल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT