Romance Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Matrimonial Fraud Scam: लग्नाच्या आमिषाने सायबर फसवणूक; पिंपरीतील तरुणाचे 90 लाख लंपास

मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख, गोड बोलण्यात गुंतवणुकीचा सापळा; सायबर पोलिसांचा इशारा – 1930 वर त्वरित तक्रार करा

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: जोडीदाराच्या शोधात चाळीशी गाठलेले अविवाहित सध्या सायबर चोरट्यांच्या रडारवर आले असून, ‌‘लग्नाची गोड स्वप्ने‌’ दाखवत लाखोंची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार राज्यभरात वाढू लागले आहेत. सर्व प्रयत्न करूनही लग्न जुळत नसल्याने अनेकजण ऑनलाइन मॅट्रिमोनियल वेबसाईट्‌‍स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व विवाह संकेतस्थळांचा आधार घेत आहेत; मात्र वैयक्तिक माहिती उघडपणे शेअर करताना ते अनोळखी व्यक्तींच्या जाळ्यात अडकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येऊ लागले आहे.

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत काही प्रकरणांत तरुणांकडून बँक खात्याची माहिती, ओटीपी, नेट बँकिंग डिटेल्सदेखील मिळवली जातात. सुरुवातीला छोट्या रकमेवर ‌‘नफा‌’ दाखवून विश्वास वाढवला जातो. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवायला लावली जाते. एकदा का बँक खाते रिकामे झाले की फोन उचलणे बंद, सोशल मीडियावर ब्लॉक आणि संपर्क पूर्णपणे तोडला जातो. अनेक दिवस प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मात्र, तोपर्यंत मोठी आर्थिक हानी झालेली असते. भावनिक धक्का आणि सामाजिक संकोच यामुळे काही पीडित उशिरा तक्रार देतात.

भावनिक फसवणुकीचा नवा ट्रेंड

सायबर गुन्ह्यांमध्ये ‌‘रोमान्स स्कॅम‌’ किंवा ‌‘मॅट्रिमोनियल फॉड‌’ हा प्रकार वेगाने वाढत आहे. विशेषतः 35 ते 45 वयोगटातील, आर्थिकदृष्ट्‌‍या स्थिर पण अविवाहित पुरुषांना लक्ष्य केले जाते. सामाजिक दबाव, एकटेपणा आणि लग्नाची चिंता या भावना चोरट्यांसाठी मोठे हत्यार ठरत आहेत.

काही वैयक्तिक कारणांमुळे माझे लग्न वेळेत होऊ शकले नाही. त्यामुळे वधूच्या शोधासाठी ऑनलाइन सर्च केला. एका वेबसाईटवरून मुलीचा नंबर मिळाला. ती गोड गोड बोलून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होती. ‌‘आपण दोघांचे भविष्य उज्ज्वल करू‌’ असे सांगितले. मी तिला बायको मानले आणि तिच्या म्हणण्यानुसार तब्बल 90 लाख रुपये गुंतवले. मात्र, काही दिवसांत संपर्क तुटला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत मी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पीडित तरुण, पिंपरी-चिंचवड

मधुर आवाजाच्या तरुणींकडून भावनिक संवाद

सायबर चोरटे अशा भावनिकदृष्ट्‌‍या असुरक्षित व्यक्तींना लक्ष्य करतात. ‌‘आपल्याला योग्य जोडीदार मिळाला‌’ या आशेने अनेक जण समोरच्याच्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवतात. विशेषतः मधुर आवाजात संवाद साधणाऱ्या तरुणींमार्फत विश्वास संपादन केला जातो. सुरुवातीला नियमित फोन कॉल, चॅटिंग, व्हिडिओ कॉलद्वारे नाते दृढ केले जाते. त्यानंतर ‌‘आपल्या भविष्यासाठी काहीतरी गुंतवणूक करूया‌’, ‌‘आपण दोघे मिळून भविष्य घडवू‌’ अशा भावनिक संवादातून शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो, विदेशी गुंतवणूक योजना किंवा ‌‘जादा परतावा‌’ देणाऱ्या स्कीममध्ये पैसे टाकण्यास भाग पाडले जात आहे.

विवाह संकेतस्थळे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तींवर तात्काळ विश्वास ठेवू नये. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी, योजना व व्यवहारांची अधिकृत पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. बँक खाते क्रमांक, ओटीपी, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. फसवणूक झाल्यास विलंब न करता 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. वेळेत तक्रार दिल्यास काही प्रमाणात रक्कम ‌’फीज‌’ करण्याची शक्यता वाढते.
रविकिरण नाळे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

काय काळजी घ्यावी?

  • अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणूक सल्ल्यावर विश्वास ठेवू नका

  • विवाह संकेतस्थळांवरील प्रोफाइलची स्वतंत्र पडताळणी करा

  • ओटीपी, नेट बँकिंग डिटेल्स, कार्ड माहिती कधीही शेअर करू नका

  • ‌‘जादा परतावा‌’ देण्याचे आश्वासन म्हणजे संभाव्य धोका

  • संशयास्पद व्यवहार तात्काळ 1930 वर कळवा

लग्नाची इच्छा स्वाभाविक असली, तरी भावनिक निर्णय आर्थिकदृष्ट्‌‍या घातक ठरू शकतात. ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा संयम, पडताळणी आणि कुटुंबीयांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सायबर चोरट्यांचे जाळे दिवसेंदिवस भावनिक पातळीवर परिणाम करणारे होत आहे. त्यामुळे ‌‘गोड बोलणारी‌’ व्यक्ती खरोखरच आयुष्याची साथीदार आहे की फसवणुकीची नवी पद्धत आहे, याची खात्री करूनच पुढचे पाऊल टाकणे गरजेचे आहे.
डॉ. पूजा मिसाळ, डायरेक्टर ऑफ मेडिसिन, वृद्धावस्था मेंदू व मनोविकार तज्ञ, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT