Pimpri dowry death case
पिंपरी: वाकड येथे सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि. 18) सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, माहेरच्यांनी हा प्रकार हुंडाबळी असल्याचा आरोप केला आहे.
दिव्या सूर्यवंशी (26) मृत विवाहितेचे नाव असून तिचा भाऊ देवेंद्र भाऊसाहेब खैरनार (रा. मोहाडी, ता. डांगरी, जि. धुळे) यांनी मंगळवारी (दि. 19) वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2022 मध्ये थाटामाटात लग्न झाले होते. माहेरच्यांनी 40 तोळे सोने व सुमारे 20 लाख रुपये खर्च केला होता. मात्र, काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी नोकरी मिळत नसल्याचे, फर्निचरसाठी पैसे न आणल्याचे आणि मुलबाळ न झाल्याचे कारण पुढे करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
घरकामाचा ताण, मानसिक छळ व मारहाणीचे प्रकार सुरू झाले. दरम्यान, रक्षाबंधनासाठी भाऊ पुण्यात येणार असल्याचे समजल्यावर दिव्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत समजावण्यासाठी माहेरकडील मंडळी दिव्याच्या नणंदेकडे गेले; मात्र त्यांनीही दिव्यालाच दोषी ठरवले. तपास वाकड पोलिस करत आहेत.
मृतदेहावर मारहाणीच्या ताज्या खुणा दिसून आल्या आहेत. शारीरिक व मानसिक छळ करत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले असून हा प्रकार सरळसरळ हुंडाबळीचाच असल्याचा आरोप माहेरच्यांकडून करण्यात आला आहे.