पंकज खोले
उद्योगनरीत बांधकाम साईटवर काम करणारा, खोदकाम, बिगारी, हेल्पर अशी अंगमेहनतीचे काम करणारा मोठा वर्ग आहे. ऐरवी कामासाठी मजूर अड्ड्यावर कामासाठी गर्दी करणाऱ्या कामगारांनी गाव गाठले आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावे पाण्यात आहेत. अशा परिस्थितीत उद्योगनगरीत रोजीरोटीसाठी आलेला कामगार घर वाचवावं की, भाकरीमागं पळावं, अशा दुहेरी संकटात सापडला आहे. (Latest Pimpri chinchwad News)
मराठवाडा, विदर्भ, अहमदनगर येथून कामगार शहरात येतात. दिवसभर चौकातील नाक्यावर थांबून हाताला काम मिळेल, या आशेवर वाट पाहत थांबतात; मात्र ऐन सणासुदीच्या काळात पावसाचा तडाखा बसल्याने घरदार, शेतवाडी पाण्याखाली गेले. गावाकडच्या घराच्या तसेच कुटुंबाच्या चिंतेने अनेकांनी गाव गाठले; मात्र तेथे गेले तर पोटाला काय खायचं अशी विवंचना. रोजीरोटीसाठी काम करावे म्हटले तर हाताला काम मिळत नाही, अशा परिस्थितीत कुटुंब जगवायचं कसं, हा प्रश्न या कामगारांसमोर उभा राहिला आहे.
शहरातील जवळपास दहा ते बार ठिकाणी विविध चौकात मजूर अड्डे आहेत. तेथे दिवस उजाडल्यापासून दुपार पर्यंत हाताला काम मिळेल, या आशेवर हे कामगार थांबलेले असतात. बांधकाम साईटवरील कामे, खोदकामे, साफसफाई, घरातील सामानाचे शिफ्टींग अशी अंगमेहनतीचे कामे हे करतात. दिवसभर कामाच्या शोधात एकाच जागी ते थांबवलेले असतात. यातील बहुतांश वर्ग हा गावाकडे काही काम नसल्याने येथे सहा महिने कामासाठी येतात. त्यात मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या पट्टयातील आहे. सणासुदीच्या काळात ते गावाला जातात. त्यानंतर पुन्हा ते शहराकडे परततात.
दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापूर्वी मराठवाड्यात तसेच विदर्भात काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे अनेक खेडी पाण्यात होती. अनेकांची शेतीदेखील पाण्याखाली गेली. गावाकडे आलेल्या आस्मानी संकटामुळे कुटुंबियांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी कामगारांनी गावाकडचा रस्ता पकडला. पावसाच्या तडाख्यात घर, पशूधन देखील सापडले आहे. अनेकांची हातची पिके जमीनदोस्त झाली. या संकटाला तोंड देण्यासाठी शहरात आलेल्या कामगारांनी गावाकडे धाव घेतली; मात्र तेथे कामाची, दोन वेळेच्या जेवणाची भांत निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईलाजास्तव अनेक कामगारांना शहराकडे परतण्याशिवाय मार्ग नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुटुंबाची चिंता
शहरातील मजूर अड्ड्यावर सकाळी मोठी गर्दी असते. त्यात शनिवार, रविवारी दोन दिवस हमखास काम मिळत असल्याने अनेक महिला देखील काही काम मिळेल, या आशेने लेकरांसह मजूर अड्ड्यावर दिसून येतात; मात्र गेल्या आठ दिवसांपासून ही गर्दी कमी झाली आहे. गावाकडे पावसामुळे कुटुंबाच्या चिंतेने त्यांनी घर गाठले आहे.
शहरातील मजूर अड्ड्यांवर गेल्या दोन आठवड्यांपासून कामगारांची वर्दळ रोडावली आहे.
गावाकडे पावसामुळे घराचे नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून गावालाच आहे. शहरात ठेकेदाराकडे पैसे मागण्यासाठी आलो होतो. गावाकडे काम शोधून पुढील चार महिने आता गावाकडेच राहणार आहे.सुनील राठोड, बीड, कामगार
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा तडाखा बसला आहे. गेल्या वर्षीच पुण्यात कामासाठी आलो होतो. पावसामुळे गावातील घराचे, शेतीचे नुकसान झाले. आता बायका-पोरांना घेऊन पुन्हा शहराकडे येण्याचे ठरवले आहे.चंद्रसेन खोपडे, कामगार, वाशीम