पिंपरी: तळवडे येथील आयटी पार्क परिसरात एक ३० वर्षीय महिला आणि ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना आज सकाळी देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत उघडकीस आली
मंगला सुरज टेंभरे (३०, रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (५५, रा. अकोला) असे खून झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ठेकेदार दत्तात्रय साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला टेंभरे आणि जगन्नाथ सरोदे हे तळेवडे परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान, आज सकाळी नागरिकांना त्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
तपासादरम्यान, पोलिसांनी ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून घटनास्थळी साक्षीदारांचे जबाब, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरु आहे. या घटनेमुळे तळेवडे आयटी पार्क आणि आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.