Maharashtra crime control Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra crime control: अवैध धंद्यांवर आता ‘स्थानबद्धतेचा’ चाबूक

महाराष्ट्र विधानमंडळाचा नव्याने सुधारित अधिनियम प्रकाशित करण्यात आला आहे

संतोष शिंदे
  • कायद्यातील नव्या तरतुदीमुळे मटका, जुगार, वेश्याव्यवसायाचा धंदा करणारे ‘एमपीडीए’च्या कक्षेत

  • पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कुंडल्या काढण्याचे काम सुरू

पिंपरी : मटका, जुगार, वेश्याव्यवसाय, बेकायदा लॉटरी आणि मानवी तस्करीसारख्या अवैध धंद्यांवर कारवाईस अडथळा ठरणार्‍या कायद्यातील जुन्या मर्यादांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 9 जून 2025 रोजी राष्ट्रपतींच्या संमतीनंतर महाराष्ट्र विधानमंडळाचा नव्याने सुधारित अधिनियम प्रकाशित करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत अशा अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना थेट ‘स्थानबद्ध’ करता येणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यभरात अवैध धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मागील कायद्याची मर्यादा

यापूर्वी अशा अवैध धंद्यांवर फौजदारी कायद्यानुसार केवळ किरकोळ स्वरूपाची कारवाई केली जात होती. त्यामुळे आरोपी लगेचच जामिनावर बाहेर येत आणि पुन्हा तेच अवैध धंदे सुरू करत. परिणामी समाजात अवैध धंद्यांचे जाळे अधिकच घट्ट होत गेले. मात्र, स्थानबद्धतेच्या तरतुदीमुळे आता पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे.

किती जणांवर होणार कारवाई?

प्राथमिक टप्प्यात पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, दापोडी, काळेवाडी, वाकड, तळवडे, देहूरोड, चाकण परिसरातील पन्नासहून अधिक व्यक्तींच्या अवैध धंद्याच्या पार्श्वभूमीची तपासणी सुरू आहे. या व्यक्तींविरोधात लवकरच स्थानबद्धतेसाठी लागणारी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

स्थानबद्ध म्हणजे काय?

‘स्थानबद्ध’ म्हणजे महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (चझऊअ) अंतर्गत दिली जाणारी प्रतिबंधात्मक शिक्षा. यामध्ये गुन्हेगाराला तुरुंगात डांबता येते. मटका, वेश्या व्यवसाय, तस्करीसारख्या अवैध धंद्यांत वारंवार गुंतलेल्या व्यक्तींना या अंतर्गत 6 महिने ते 1 वर्षासाठी न्यायालयीन सुनावणीशिवाय कारागृहात ठेवता येईल.

काय आहे नव्या कायद्यातील तरतूद?

यापूर्वी केवळ सार्वजनिक शांतता भंग करणार्‍या सराईत गुन्हेगारांनाच महाराष्ट्र प्रतिबंधक कारवाई अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करता येत होते; मात्र आता मटका, जुगार, बेकायदा लॉटरी, वेश्या व्यवसाय, मानवी तस्करी आणि इतर तत्सम अवैध धंदे करणार्‍यांनाही या अधिनियमाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. राज्यभर या सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पोलिस प्रशासनासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे.

‘कुंडली काढण्याची’ मोहीम सुरू

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या नव्या कायद्याच्या आधारे शहरातील विविध भागांत मटका, जुगार, वेश्याव्यवसाय आणि बेकायदा लॉटरी चालवणार्‍या व्यक्तींच्या फाईली उघडण्यास सुरुवात केली आहे. अशा व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून, संबंधित पुरावे गोळा करून स्थानबद्धतेसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

नवीन कायद्याच्या धसक्याने मटका, जुगार, वेश्याव्यवसाय व बेकायदा लॉटरी चालवणार्‍यांमध्ये सैरभैर स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या गुप्त यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेकांनी धंदा बंद करून गुपचूप ठिकाणे बदलली आहेत. काहींनी तर पोलिस रेकॉर्डवरील आपले नाव काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT