पिंपरी: शाळेच्या सहलीदरम्यान मुलींच्या नृत्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून डिलीट करावा लागल्याचा राग मनात धरून नववीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला.
शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावरच विद्यार्थिनीच्या छातीवर आणि डाव्या डोळ्याजवळ चाकूने वार करण्यात आले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास म्हाळुंगे येथील एका शाळेत घडली. जखमी विद्यार्थिनीवर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेने शाळेच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बावधन पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. जखमी विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथील एका शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांची १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे सहल गेली होती. सहलीदरम्यान आयोजित कार्यक्रमात काही विद्यार्थिनी नृत्य करीत होत्या.
त्याचा व्हिडिओ त्यांच्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला होता. यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. अखेर संबंधित विद्यार्थ्याला इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ डिलीट करावा लागला. मात्र, हा प्रकार त्याच्या जिव्हारी लागला होता.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आले. दुपारी दोनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जाण्यासाठी बाहेर पडत होते.
त्याचवेळी संबंधित विद्यार्थिनी प्रवेशद्वाराजवळ आली असता अल्पवयीन विद्यार्थ्याने तिच्यावर चाकूने हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या छातीवर आणि डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहलीतील एका व्हिडिओवरून सुरू झालेला वाद थेट चाकूहल्ल्यापर्यंत पोहोचल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बावधन पोलिस तपास करीत आहेत.
दप्तरांची होणार तपासणी
शाळेच्या प्रवेशद्वारावरच चाकूहल्ला झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या दप्तरांची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच, शाळेच्या आवारात धोकादायक वस्तू आणल्या जाऊ नयेत आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता यावी, यासाठी अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
हल्लेखोर विद्यार्थ्याची शाळेतून हकालपट्टी
या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित शाळा व्यवस्थापनाने त्या विद्यार्थ्याला शाळेतून निष्कासित केले आहे. याबाबत शाळेने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले असून, घडलेल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
तिच्या कुटुंबीयांना आवश्यक सहकार्य केले जात असून, पोलिस तपासातही शाळा प्रशासन पूर्ण सहकार्य करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच, या घटनेचा इतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये, यासाठी शाळेतील समुपदेशकांची मदत घेतली जात आहे.