पिंपरी: गॅसचे कनेक्शन मंजूर झाले आहे; परंतु सिलिंडरसाठी थोडे दिवस थांबावे लागेल, असे उत्तर ऐकत शहरातील अनेक ग्राहक गॅस एजन्सीजच्या फेऱ्या मारत आहेत. एलपीजी गॅस कनेक्शनसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह शुल्कही भरले. मात्र, प्रत्यक्षात अनेकांना गॅसचे कनेक्शन मिळण्यास प्रतीक्षा करावी लागत आहे.
दैनंदिन नियोजन विस्कळीत :
गॅस कनेक्शनसाठी कागदपत्रांची पूर्तता, शुल्क भरणे आणि प्रक्रिया पूर्ण करूनही कनेक्शन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही ग्राहकांना इंडक्शन शेगडी, काहींना हॉटेलमधील जेवण तर काहींना नातेवाईकांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागले.
विशेषतः नवीन घरात राहायला गेलेल्या कुटुंबांना या विलंबाचा सर्वाधिक फटका बसला. कनेक्शन कधी मिळेल, या प्रश्नाचे संबंधित एजन्सीकडून निश्चित उत्तर मिळत नसल्याने अनेकांचे घरगुती नियोजन विस्कळीत झाले.
तात्पुरता ५ किलो सिलिंडर; ग्राहकांना दिलासा
प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांची गैरसुविधा लक्षात घेऊन येत्या काही आठवड्यात गॅस एजन्सीजनी तात्पुरत्या स्वरूपात ५ किलोचा एलपीजी सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी कनेक्शन मिळेपर्यंत ग्राहकांना स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत आहे.
विशेषतः लहान कुटुंबे, विद्यार्थी, नोकरीनिमित्त स्थलांतरित नागरिक आणि नव्याने घर सुरू करणाऱ्यांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरू शकेल.
नवीन गॅस कनेक्शनच्या प्रलंबित अर्जांची संख्या वाढल्याने काही गॅस एजन्सींनी तात्पुरत्या स्वरूपात नवीन अर्ज स्वीकारणे थांबवले असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रलंबित ग्राहकांना प्रथम कनेक्शन देण्यावर भर दिला जात असून, त्यानंतरच नवीन अर्ज स्वीकारले जातील, असे काही एजन्सींकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवीन कनेक्शनसाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
आता येणार १० किलो कंपोझिट सिलिंडर
गॅस वितरकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यात १० किलो कंपोझिट एलपीजी सिलिंडरचे कनेक्शन सुरू होणार आहे. हा सिलिंडर वजनाने हलका असून गंजरोधक आहे. त्याच्या पारदर्शक बाह्य आवरणामुळे गॅसची उर्वरित पातळी पाहता येते. सुरक्षेच्या दृष्टीनेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची निर्मिती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गॅस क्षेत्रात हलक्या आणि अधिक सुरक्षित सिलिंडरच्या वापराकडे वाढता कल पाहता हा पर्याय ग्राहकांसाठी अधिक सोयीचा ठरण्याची शक्यता आहे.