Lonavala Taxi Protest Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Taxi Protest: लोणावळ्यात टॅक्सीचालकांचे आंदोलन; ओला-उबरवर बंदीची मागणी

उपोषणानंतरही तोडगा न निघाल्यास 1 मे रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रास्ता रोकोचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: जागतिक पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात आता स्थानिक टॅक्सीचालक आणि बाहेरील ऑनलाईन टॅक्सी कंपन्या यांच्यातील संघर्ष तीव झाला आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या कंपन्यांमुळे स्थानिक टॅक्सीचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या कंपन्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने तीन दिवसीय साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र दिनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर रास्ता रोको करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या ग््राामीण भागातील सुमारे 450 हून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णतः टॅक्सी व्यवसायावर अवलंबून आहे. साखळी उपोषण करून देखील न्याय न भेटल्यास 1 मे कामगारदिनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंकजवळ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपासून लोणावळा शहरामध्ये हे साखळी उपोषण सुरू आहे. लोणावळा शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाच्या स्थळी येऊन साखळी उपोषणाला व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

प्रशासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष

शासकीय स्तरावर याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. तालुका पोलिस प्रशासन, आरटीओ व या तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी मात्र या आंदोलनाकडे कानाडोळा केला असल्यामुळे हे आंदोलन अधिक तीव करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

राजकीय, सामाजिक संघटनांचा पाठिंबा

लोणावळा शहरातील बहुतांश सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन ज्या पद्धतीने आंदोलन करेल त्या सर्वांमध्ये आम्ही सहभागी होऊ व त्यांच्या मागणी मान्य करण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर देखील उतरू, असे आश्वासन त्यांना दिले आहे. 1 मे या कामगार दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिसिंग लिंक या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. त्याच ठिकाणी टॅक्सीचालक-मालक आपल्या 300 ते 400 गाड्या घेऊन जाऊन रास्ता रोको आंदोलन करेल व यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देखील लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. साखळी उपोषणाचा उद्या शेवटचा दिवस असून प्रशासनाकडून यामध्ये योग्य मार्ग न काढल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT