लोणावळा: लोणावळा शहरातील जुन्या पोलिस ठाण्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या आहेत. 6 जुलै रोजी लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्या पुराचा फटका पोलिस ठाण्यालादेखील बसला.
पोलिस ठाण्यातदेखील पाणी घुसल्याने लोणावळा बाजारातील पोलिस ठाण्याचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरण करण्यात आले होते. तेव्हापासून बाजार भागातील पोलिस ठाणे हे रिकामे होते. त्याठिकाणी पोलिस नाहीत याचा अंदाज घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पोलिस ठाण्यावर दगडफेक करत अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या आहेत.
लोणावळा बाजार भागातील वाहतूक कोंडी व त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या निमित्ताने जुने पोलिस ठाणे हे पुन्हा कार्यान्वित करत त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी सांगितले होते. मागील दोन तीन महिन्यांपासून पोलिस ठाणे हे रिकामी असल्यामुळे त्याची साफसफाई व स्वच्छता करत लवकरात लवकर ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ठाणे बंद असल्यामुळे पसरली अस्वच्छता
या अनुषंगाने पोलिस ठाण्याची पाहणी केली असता अधिकारी एक कक्षाच्या काचा कोणीतरी दगडफेक करून फोडल्याचे दिसून आले. सर्व कक्ष हे रिकामे पडल्यामुळे कचऱ्याने भरले आहेत. अधिकारी कक्षाच्या काचांवर ही दगडफेक नेमकी कोणी केली, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी झालेली घटना ही निंदनीय आहे.
पोलिस हे शहराचे व नागरिकांचे रक्षणकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखली जाते. एखादे पोलिस ठाणे रिकामे आहे अथवा वापरात नाही म्हणून त्यावर दगडफेक करत त्या वास्तूच्या काचा फोडणे हे अतिशय दुर्दैवी व चुकीचा प्रकार असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.