लोणावळा: लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात पार पडली. 21 डिसेंबर रोजी निकाल घोषित झाला. नगराध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे हे बहुमताने निवडून आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 13 जानेवारी रोजी पहिली सभा होणार आहे. या सभेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांची निवड केली जाणार आहे.
लोणावळा नगर परिषदेत या वेळी राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाची सत्ता आली असल्याने पक्षाकडून कोणाला प्रथम उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग््रेासचे 16 नगरसेवक विजयी झाले असून, त्यामध्ये तब्बल 11 महिला नगरसेविका व 5 पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे.
महिलांची संख्या जास्त असल्याने व त्यातही काही महिलांनी विक्रमी मते मिळवल्याने पक्षाकडून त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जाणार की एकमेव अनुभवी नगरसेवक असलेल्या खंडाळा प्रभागातील नगरसेवकाला ही संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सोबतच विविध पक्षातून निवडून आल्यानंतरदेखील सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनादेखील सन्मानजनक पदांचे वाटप करावे लागणार असल्याने त्यांना कोणती पदे दिली जाणार, याबाबतदेखील सर्वांना उत्सुकता आहे.