Lonavala Triple Accident
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गीकेवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी (दि. 1) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रकचालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तिघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची समोर असलेल्या कंटेनरला जोरदार धडक बसली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.
या अपघातात ट्रकचालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून, एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (वय 80), मुकिंदा सस्ते (वय 56) आणि महेंद्र पाल (वय 39) यांचा समावेश आहे.
अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या मदतकार्यात महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलिस स्टेशन, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन अशा विविध यंत्रणानी सहभाग घेतला.