Ravi Landge Missing Link Selfie Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Missing Link Selfie Controversy: लोणावळा मिसिंग लिंक: सेल्फी बंदीच्या नियमांवरून महापौर रवी लांडगे वादाच्या भोवऱ्यात

पोलिसांचा कारवाईचा इशारा; व्हीआयपींसाठी वेगळे धोरण का? असा प्रश्न उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: लोणावळा येथील मिसिंग लिंकवर सेल्फी किंवा छायाचित्र काढण्यास; तसेच थांबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महामार्ग पोलिसांनी दिला आहे. असे असताना पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी मिसिंग लिंकवर छायाचित्र काढले. ते छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर सर्वसामान्य जनतेने महापौर लांडगेंसह महामार्ग पोलिसांना लक्ष केले आहे.

मिसिंग लिंकवर ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहने धावतात, अशा वेळी या मार्गावर वाहन थांबवणे जीवावर बेतणारे ठरेल, असे म्हणत पोलिसांनी सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. त्याप्रमाणे महापौर लांडगेंवर गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बहुचर्चित मिसिंग लिंकचे महाराष्ट्र दिनी शुक्रवारी (दि.1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मिसिंग लिंकचा 180 फुटी झुलत्या पुलावरून निसर्गाचे सौंदर्य आकर्षित करणारे आहे. त्यामुळे या मिसिंग लिंकवरुन प्रवास करण्यासाठी नागरिक उत्सुक्त आहेत. मिसिंग लिंक खुला झाल्यानंतर तो प्रवास अनुभवण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे.

मिसिंग लिंकवरुन ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहने धावत असल्याने तेथे थांबणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखे आहे. तरी सुद्धा अनेक वाहनचाक मिसिंग लिंकवर थांबून, जीवघेणा खेळ करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मिसिंग लिंकवर सेल्फी व छायाचित्र काढण्यासाठी थांबणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक वाहनचालकांवर कारवाईही केली आहे.

महापौर लांडगे यांनी सोमवार (दि.4) मुंबईला जाताना मिसिंग लिंकवर थांबून छायाचित्र काढले. ते छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांच्या या पोस्टवर सर्वसामान्यांनी टीकेची झोड उठवली आहे. महापौरांसह पोलिसांवर सर्वसामान्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिसांनी महापौरांना मिसिंग लिंकवर थांबण्याची परवानगी दिली होती का? छायाचित्र काढण्यासाठी मुभा दिली होती का? नसेल तर त्यांच्या वाहनावर कारवाई केली का? गुन्हा दाखल केला का? पोलिसांचे सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचे धोरण आणि व्हीआयपींसाठी वेगळे धोरण आहे का, पोलिस महापौरांच्या वाहनावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT