लोणावळा: शहरामध्ये मागील 24 तासांमध्ये तब्बल 625 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. यापैकी 450 मिमी हा रविवार रात्री ते सोमवार पहाटेदरम्यान झाल्यामुळे शहराची पहाट उजाडली ती पाण्याच्या विळख्याने. संपूर्ण लोणावळा शहरामध्ये पाणीच पाणी झाले आहे.
टाटा धरण ओव्हरफ्लो
टाटा धरण पूर्ण भरले असून, धरणाचे पाणी भिंतीवरून लोणावळा शहरामध्ये येत आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीपात्रातील पाणी हे आजूबाजूच्या परिसरामध्ये घुसण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठ दिवसांपासून शहरामध्ये सातत्याने पाऊस सुरू असून, मागील 72 तासांपासून शहरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. मागील 8 दिवसांत शहरात 1322 मिमी पाऊस झाला आहे.
हुडको कॉलनीत घुसले पाणी
शहरातील हुडको कॉलनी, भांगरवाडी येथील दामोदर कॉलनी आणि निशिगंध सोसायटीच्या परिसरामध्ये पाणी घुसले होते. नांगरगाव ते भांगरवाडी गेट दरम्यानचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्या होता. या परिसरातील इंद्रायणी सोसायटी, आदर्श कॉलनी, जाधव कॉलनी सुरैया सोसायटी, नक्षत्र सोसायटी, वृंदावन सोसायटी व इतर आजूबाजूच्या सोसायटी यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा विळखा पडला आहे.
एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली पाणी
वलवण नांगरगाव रस्त्यावरून पाणी वाहत आहे. बापदेव मंदिर रस्त्यावर साधारण चार ते साडेचार फूट पाणी साचले होते. डेनकर कॉलनीमध्ये अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून, नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. वलवण गावातून मनशक्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तुंगार्ली बद्री विशाल सोसायटीच्या पूर्ण परिसरात पाण्याचा विळखा पडला आहे. खंडाळा भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठोंबरेवाडी येथे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी गावात घुसले असून, अनेक घरांचे यामध्ये नुकसान झाले आहेत. लोणावळा बाजारपेठेतील अनेक रस्त्यांना व घरांना पाण्याचा फटका बसला आहे.
हुडको कॉलनीत ८ ते १० फूट पाणी
लोणावळ्यातील हुडको कॉलनी येथे ८ ते १० फूट पाणी भरले असून, अनेक घरांचे पहिले मजले पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना रोप बांधून बाहेर काढले जात आहे. पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने पाण्याची पातळी वाढत आहे. सकाळी ज्या भागात ४ ते ५ फूट पाणी होते, तेथे दुपारनंतर ८ ते १० फूट पाणी झाले आहे.
साते फाटा येथे कार, टेम्पो गेले वाहून
मुंबई-पुणे महामार्गावर साते फाटा येथे ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने टेम्पो व कार अशी दोन वाहने वाहून गेल्याची घटना घडल्या, परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावर साते फाटा येथे कान्हे स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी रस्तावर साचले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. यादरम्यान सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथून मावळ तालुक्यातील वडिवळे येथील श्री महादेव मंदिरात दर्शनासाठी मारुती कार गाडीने एक दाम्पत्य चालले होते. साते फाटा येथे पाण्याच्या प्रवाहात ही कार वाहून चालली होती. दरम्यान, स्थानिक रहिवाशी सुधीर सातकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यातून रस्ता काढत जाऊन त्यांना मृत्युच्या दारातून बाहेर काढले. दरम्यान, कार मात्र पाण्यात दिसेनासी झाली आहे. संबंधित महिलेला डोक्याला दुखापत झाली होती.
दुसऱ्या घटनेत साते फाटा याच ठिकाणी एक मालवाहतूक टेम्पो महामार्गाच्याकडेला दक्षिण बाजूकडे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. टेम्पो पाण्यात असल्याने आतील व्यक्तींना बाहेर येता येत नव्हते. ओढ्यालगत उभे असलेल्या प्रत्यक्षदर्शींसमोर हा टेम्पो बघताबघता ओढ्यात बुडाला. त्यामुळे उपस्थितांनी समोर असूनही काही मदत करता आली नसल्याने मोठी खंत व्यक्त केली.