Lonavala Flood Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Flood Damage: लोणावळा पूरप्रकरण तापले; १९०० कुटुंबांच्या नुकसानीवरून टाटा कंपनीविरोधात २८ जुलैला मोर्चा

मान्सून लेकमधून आलेल्या पाण्यामुळे शहर जलमय; भरपाईच्या मागणीसाठी नगर परिषद आक्रमक, टाटांविरोधात जनहित याचिकेची तयारी

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा जुलै रोजी भयंकर पूरपरिस्थिती निर्माण होत 1900 कुटुंब यामध्ये बाधित झाली आहेत. टाटा कंपनीच्या मान्सून लेकमधून मोठ्या प्रमाणात शहरात पाणी आल्यामुळे अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाच ते दहा फुटांपर्यंत पाणी साचले गेले. यामध्ये नागरिकांचे अतोनात हाल झाले. घरातील सर्व साहित्य पाण्यात वाहून गेले, नादुरुस्त झाले. या सर्व परिस्थितीला टाटा कंपनीचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचा ठपका लोणावळा नगर परिषदेने ठेवला आहे. टाटा कंपनीने मान्य करूनदेखील भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मंगळवारी (दि. २८) टाटा कंपनीविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

टाटा कंपनीसोबत आमदार सुनील शेळके यांची नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणीदेखील चर्चा झाली. मात्र, टाटा कंपनी कोणत्याही प्रकारे लोणावळ्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यास तयार नसल्याचे नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी लोणावळा शहरातील सर्वपक्षीय व नागरिकांच्या संयुक्त बैठकीत सांगितले. टाटा कंपनी आपली जबाबदारी झटकत असल्याने या विरोधात आवाज उठवत संपूर्ण लोणावळा शहराच्या वतीने टाटा कंपनीच्या विरोधात 28 जुलै रोजी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय या लोणावळा नगर परिषदेने घेतला आहे. या मोर्चाबाबतचे नियोजन व नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी लोणावळा नगर परिषदेमध्ये शनिवारी 25 जुलै रोजी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

लोणावळा शहरात पाच व सहा जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे टाटा कंपनीचे मान्सून धरण पूर्णपणे भरले. हे धरण भरल्यानंतर त्यामधील पाणी डक्ट लाईनच्या माध्यमातून खोपोली भागात सोडले जाते. यंदा मात्र टाटा कंपनीने हे पाणी डक्ट लाईनमधून सोडले नाही. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाणी लोणावळा शहरामध्ये येऊ लागले. जोरदार पडणारा पाऊस व त्यामध्येच धरणांमधून मोठ्या प्रमाणात शहरात आलेले पाणी यामुळे अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाच ते दहा फुटापर्यंत पाणी साचले गेले. रस्टिक हायलंड या ठिकाणी दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती व राडाराडा डक्ट लाईनमध्ये आल्यामुळे पाणी अडले गेले असे कारण टाटा कंपनीने दिले आहे.

मात्र, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याकरता टाटा कंपनीने उपाययोजना करणे गरजेचे होते, अशा भावना नगर परिषदेने व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या बैठकीला लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक तसेच लोणावळा शहरातील राजकीय पक्षांचे अध्यक्ष, व्यापारी व पूरग्रस्तबाधित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमताने या टाटा कंपनीच्या विरोधातील धडक मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

टाटा विरोधात जनहित याचिका दाखल करणार

पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे कधीही भरून न येणारे असे अतोनात नुकसान झाले आहे. या संकट समयी टाटा कंपनीने लोणावळा शहरातील नागरिकांच्या सोबत उभे राहणे गरजेचे असताना त्यांनी मदत करण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला आहे, असे नगरसेवकांनी या आढावा बैठकीमध्ये नागरिकांना सांगितले. याकरिता टाटा कंपनीच्या विरोधात आवाज उठवत या नुकसानीची भरपाई टाटा कंपनीने द्यावी या मागणीसाठी सदरचा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या वेळेस सांगण्यात आले. तसेच टाटा कंपनीच्या विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्याबाबत देखील चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT