Lohagad Fort Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Lohagad Fort Accident: सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

या दुर्घटनेमुळे गहुंजे परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने डोळ्यांत साठवून विवाहाच्या तयारीत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा लोहगड किल्ल्यावर पाय घसरून दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अगरवाल (रा. लोढा बेलमेंडो, गहुंजे, ता. मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे गहुंजे परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

केतनचा विवाह येत्या १४ जुलैला जयपूर येथे एका आलिशान पॅलेसमध्ये थाटामाटात होणार होता. या विवाह सोहळ्याची सर्व जय्यत तयारी पूर्ण झाली होती.

लग्नासाठी विमान तिकिटेही काढण्यात आली होती. याच आनंदाच्या वातावरणात, गुरुवारी केतन आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. किल्ला पाहताना आणि छायाचित्रे (सेल्फी) काढत असताना अचानक केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.

या बचावकार्यात आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशाल पिसे, सागरदळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना कराळे, राजू कडू, योगेश दळवी, महेश मसणे आणि सुनील गायकवाड यांनी कामगिरी बजावली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, तपास सुरू आहे.

बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. लोणावळा ग्रामीण पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर 'शिवदुर्ग मित्र लोणावळा' आणि 'वन्यजीव रक्षक मावळ' या संस्थांच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अत्यंत दुर्गम आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असतानाही बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. लग्नाच्या उंबरठ्यावर असतानाच घडलेल्या या अपघातामुळे अगरवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मावळ भागात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT